‘समृद्धी’ची वाट आणखी बिकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 01:41 AM2019-06-24T01:41:55+5:302019-06-24T01:42:45+5:30
मुंबई ते नागपूर हा महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोर (एमएससी) ७१० किलोमीटरचा असून, ठाणे जिल्ह्यातील ४४ गावांमधून हा महामार्ग जात आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे : मुंबई ते नागपूर हा महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोर (एमएससी) ७१० किलोमीटरचा असून, ठाणे जिल्ह्यातील ४४ गावांमधून हा महामार्ग जात आहे. जिल्ह्यात या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास लवकरच प्रारंभ होणार असून त्यासाठी लागणारी वाहने आणि अवाढव्य यंत्रसामग्रीच्या वाहतुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. या यंत्रसामग्रीच्या वाहतुकीसाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील रस्ते वापरले जाणार आहेत; मात्र ते वापरण्यास या गावांमधील ग्रामस्थांकडून विरोध केला जात असल्याने ‘समृद्धी’ची वाट पुन्हा बिकट झाली आहे.
शहापूर येथील विहिगाव ते भिवंडी येथील वडपे या दोन गावांदरम्यान ८० ते ८५ किलोमीटरचा समृद्धी महामार्ग जात आहे. त्यासाठी भूसंपादन जवळजवळ पूर्ण झाले आहे. आता हा महामार्ग तयार करण्यासाठी मोठमोठी यंत्रसामग्री आणण्यासह बांधकाम साहित्यपुरवठ्यासाठी वाहनांची येजा राहणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या रस्त्यांची चाचपणी या महामार्गाचे काम करणाºया कंपनीने केली आहे. मात्र, या वाहनांमुळे रस्त्यांची चाळण होऊन ग्रामीण जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार, म्हणून गावकरी व लोकप्रतिनिधींकडून ग्रामीण रस्त्यांच्या वापरास विरोध केला जात आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही या रस्ते वापरण्याच्या ठरावास सदस्यांनी कडाडून विरोध केला.
या तीव्र विरोधामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रस्तेवापराचा ठराव मंजूर होऊ शकला नाही. या वाहनांमुळे खराब होणाºया रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा निधी संबंधित कंपनीकडून आधीच जमा करून घेण्याच्या मुद्यालाही विरोध झाल्यामुळे जिल्हा परिषदेला हा ठराव अखेर मागे घ्यावा लागला आहे. समृद्धी राष्टÑीय महामार्ग राज्यातील नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक व कोकण या पाच महसूल विभागांतील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद अहमदनगर, नाशिक व ठाणे या १० जिल्ह्यांतील २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जात आहे. नागपूर ते भिवंडीपर्यंतच्या ७१० किलोमीटर अंतराच्या नियोजित मार्गाची आखणी करताना प्रामुख्याने दाट लोकवस्ती, बागायती जमीन, मोठी धरणे, वनजमिनी, जलाशये आणि जंगलांचा भाग वगळण्यात आला आहे.
या महामार्गाची रुंदी १२० मीटर एवढी प्रशस्त असून, त्यासाठी ५२ हजार एकर जमिनीचा वापर होत आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ४४ गावांमधील ९८० शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा समावेश आहे. हा नागपूर ते मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी, कल्याण या दोन तालुक्यांतून प्रत्येकी १० किलोमीटर गेला आहे. शहापूर तालुक्यातून सर्वाधिक ६० ते ६५ किलोमीटर जात आहे. हा महामार्ग तयार करण्यासाठी आता जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील रस्त्यांचा वापर करून महामार्ग तयार करण्यासाठी लागणारी वाहने, विविध स्वरूपाची यंत्रसामग्री आणण्यासाठी रस्त्यांची शोधाशोध सुरू झाली आहे.
महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमणात जेसीबी, डम्पर, ट्रक, रोलर आणि मोठ्या यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यासाठी मोठमोठी अवजड वाहने लागणार आहेत. त्यांची ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवरून सतत येजा सुरू राहणार आहे. त्यासाठी शहापूर तालुक्यातील दांडा-फुगाळे ते वाशाळा, ढाकणे कोथळे, हिंगळूद या रस्त्यांवरून वाहने रात्रंदिवस येजा करणार आहेत. या रस्त्यांच्या वापरासाठी जिल्हा परिषदेची परवानगी घेणे संबंधित कंपनीला क्रमप्राप्त आहे. त्यासाठी कंपनीने जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करून परवानगी मागितली आहे. मात्र, अवजड वाहनांच्या वापरासाठी ग्रामीण रस्त्यांची क्षमता नाही. या वाहनांमुळे खराब होणाºया या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीच करोडो रुपये जिल्हा परिषदेला मोजावे लागतील. याकडेही सदस्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून बांधकाम विभागाला चांगलेच धारेवर धरले.
दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे नाही निधी, ग्रामस्थांचाही विरोध
यंत्रसामग्रीच्या वाहतुकीमुळे खराब होणाºया रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी नसल्यामुळे रस्ते दुरुस्त होणार नाहीत आणि संबंधित गावकºयांना जीवघेण्या रस्त्यांचा वापर करावा लागेल. प्रसंगी त्यात जीव जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
गावकºयांचे, आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेले देवस्थान, मंदिर, पवित्र स्थळे या वाहनांच्या वाहतुकीसाठी केल्या जाणाºया रस्ता रूंदीकरणात उद्ध्वस्त करावे लागणार आहेत. रात्रंदिवस वाहतूक करणाºया या वाहनांमुळे गावकºयांचे, गायीगुरांचे, जनावरांचे अपघात होऊन जीव जातील.
वर्षानुवर्षे जपलेल्या रस्त्यांच्या दुतर्फा असलेली झाडे रुंदीकरणामुळे तोडली जातील. या आणि अन्य समस्यांकडे लक्ष केंद्रित करून रस्त्यांच्या वापरास जिल्हा परिषदेने विरोध केल्यामुळे समृद्धी महामार्गाचा प्रवास अवघड झाला आहे. ग्रामस्थही या मुद्यावर विरोध करण्याच्या तयारीत आहेत.