ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर सम्यक विद्यार्थी आंदोलन; जाणून घ्या प्रकरण काय?
By सुरेश लोखंडे | Published: December 4, 2023 04:11 PM2023-12-04T16:11:20+5:302023-12-04T16:11:43+5:30
अभाविपचे संस्थापक दत्ताजी डीडोळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या सूचनेवरून वाद
सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना अभाविपचे संस्थापक दत्ताजी डीडोळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या सूचना यूजीसीने पत्राद्वारे दिल्या आहेत. त्याविराेधात सम्यक विद्यार्थी आंदोलना तर्फे आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदाेलन करून जाहीर निषेध करण्यात आला. याशिवाय जयंती साजरी करू नये असा इशारा या विद्यार्थी आंदाेलनकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र सल्लागार समिती अध्यक्ष अंजली आंबेडकर,महेश भारतीय यांच्या मार्गदर्शनाखाली सम्यक विद्यार्थी आंदोलन आज छेडण्यात आले आहे. या आंदाेलनामध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा अध्यक्ष अनिकेत मोरे, महासचिव राजु खरात, वंचित बहुजन आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष महेंद्र अनभोरे, मोहन नाईक, कमलेश उबाळे, तारकेश जाधव, गौरव गमरे, गणेश सोनावणे, साहिल गायकवाड, सदस्य मिहिर रणशुर आदींनी सहभाग घेतला.