संदीप माळवी यांना अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:55+5:302021-07-01T04:26:55+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांची पनवेल महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागी राज्य शासनाने ...
ठाणे : ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांची पनवेल महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागी राज्य शासनाने बुधवारी महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांना पदोन्नती देऊन नियुक्ती केली.
ठाणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाच्या दोन जागा आहेत. त्यापैकी एक जागा शासनाच्या सेवेतील अधिकाऱ्यांसाठी, तर दुसरी जागा महापालिका आस्थापनेतील अधिकाऱ्यांसाठी राखीव आहे. तरीही या दोन्ही जागांवर शासनाच्या सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती होत होती. काही वर्षांपूर्वी महापालिका आस्थापनेवरील अतिरिक्त आयुक्तपदासाठी तत्कालीन उपायुक्त श्रीकांत सरमोकादम यांच्या नावाची चर्चा सुरू होती. लकी कंपाउंड इमारत दुर्घटनेत त्यांचे नाव पुढे आले आणि त्यात त्यांना अटक झाली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तपदासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार एकही अधिकारी पात्र नव्हता. त्यामुळे या पदावर पालिका आस्थापनेवरील अधिकाऱ्यांची निवड करण्याचा प्रस्ताव मागे पडला होता. गेल्या काही वर्षभरापासून या पदासाठी पुन्हा तीन ते चार अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. या चर्चेनंतरही दोन्ही जागांवर शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक होत होती. या नियुक्तीमुळे अन्याय होत असल्याची भावना पालिका अधिकाऱ्यांमध्ये होती. यातूनच या पदावर पालिका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी अधिकारीवर्गाकडून करण्यात येत होती. या मागणीनंतर आयुक्तांनी राज्य शासनाकडे यासंबंधीचा एक प्रस्ताव पाठविला होता. त्यामध्ये अतिरिक्त आयुक्तपदासाठी उपायुक्त संदीप माळवी, मनीष जोशी, विधी सल्लागार मकरंद काळे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यापैकी शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीत उपायुक्त संदीप माळवी हे पात्र ठरले असून, त्यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करून राज्य शासनाने त्यांना अतिरिक्त आयुक्तपदावर बढती दिली.