कल्याणमध्ये सेनेत बेबनाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 03:22 AM2018-08-21T03:22:42+5:302018-08-21T03:23:17+5:30

शहर, महानगरप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप; डावलले जात असल्याचा आरोप

Saneet anonymity in Kalyan! | कल्याणमध्ये सेनेत बेबनाव!

कल्याणमध्ये सेनेत बेबनाव!

Next

- प्रशांत माने

कल्याण : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये संघटनात्मक बांधणी सुरू असताना दुसरीकडे मात्र कल्याणमध्ये शिवसेनेतील अंतर्गत बेबनाव उघडकीस आला आहे. निर्णयप्रक्रिया आणि बैठकांमध्ये डावलले जात असल्याप्रकरणी काही पदाधिकारी नाराज आहेत. शहरप्रमुख विश्वनाथ भोईर आणि कल्याण महानगरप्रमुख विजय साळवी यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. काहींनी तर आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याने सेनेतील हा बेबनाव चर्चेचा विषय ठरला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर शिवसेनेतर्फे शाखाप्रमुख आणि अन्य पदाधिकारी नेमण्यासंदर्भात बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांमध्ये आम्हाला डावलले जात असल्याचा आरोप कल्याण पूर्व-पश्चिम विधानसभा संघटक अरविंद मोरे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी भोईर आणि साळवी यांना लक्ष्य केले आहे. मनमानीपणे या दोघांचा कारभार सुरू असल्याकडेही मोरे यांनी लक्ष वेधले आहे. माझ्यासह पक्षाचे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र संघटक रवींद्र कपोते आणि कल्याण पश्चिम विधानसभा सहसंघटक दीपक सोनाळकर हे सुद्धा भोईर आणि साळवी यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराज असल्याचे मोरे यांचे म्हणणे आहे.
आमची पाच पदाधिकाऱ्यांची प्रमुख कमिटी आहे. सेना भवनात बैठक असेल तर आम्हाला बोलावले जाते, परंतु स्थानिक पातळीवर अन्य पदाधिकाºयांच्या नेमणुका करताना तसेच बैठकांमध्ये मात्र डावलले जात असल्याचे आणि विश्वासात घेतले जात नसल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. भोईर यांच्याकडे याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आपले धोरण चुकीचे आहे. सर्वांना विश्वासात घेऊन काम करा. आमची गरज राहिली नसेल तर आम्ही उद्धवजींकडे राजीनामा देण्यास तयार असल्याचे त्यांना सांगितल्याचेही मोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, कपोते आणि सोनाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही नाराज असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

‘त्यांचा’ गैरसमज झाला आहे-भोईर, साळवी
सध्या कोणत्याही बैठका सुरू नाहीत आणि कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत. उद्धवजींच्या आदेशानुसार मुंबईच्या धर्तीवर गटप्रमुखांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. शाखाप्रमुख आणि नगरसेवक स्तरावर हे काम चालू आहे.

त्यामुळे या कामासाठी अन्य पदाधिकाºयांना डावलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नाराजी नसल्याचे दावा करत त्या पदाधिकाºयांचा गैरसमज झाला असावा, अशी प्रतिक्रिया शहरप्रमुख विश्वनाथ भोईर आणि महानगरप्रमुख विजय साळवी यांनी दिली आहे.

Web Title: Saneet anonymity in Kalyan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.