आदिवासी जमातीच्या न्याय हक्कासाठी धुळे ते मंत्रालय मुंबई दरम्यान संघर्ष पदयात्रा
By नितीन पंडित | Published: November 26, 2023 04:39 PM2023-11-26T16:39:50+5:302023-11-26T16:40:01+5:30
टोकरे कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार समाज भिवंडीत दाखल
भिवंडी: राज्य घटनेने अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण दिलेल्या महाराष्ट्रातील विशेषत: खान्देश भागातील टोकरे कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार या आदिवासी समाजबांधवांना जातीच्या दाखल्यापासून वंचित ठेवले जात आहे. तर अनेकांची जात पडताळणी केली जात नाही. त्यामुळे आज ही समाजातील मोठा वर्ग सोयी सुविधा पासून वंचित असल्याने त्या न्याय हक्का साठी धुळे ते मुंबई मंत्रालय येथ पर्यंत संघर्ष पदयात्रेचे आयोजन आदिवासी वाल्मीकलव्य सेना प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वा खाली करण्यात आले आहे.धुळे येथील एकवीरा मंदिर येथून १७ नोव्हेंबर पासून सुरू झालेली ही पदयात्रा रविवारी भिवंडी तालुक्यात दाखल झाली. सोनाळे येथे पदयात्रेत सहभागी समाज बांधवांचे राम लहारे,देवा फाऊंडेशन चे तानाजी मोरे,साई सेवा संस्थेचे विसुभाऊ म्हात्रे यांनी स्वागत करून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित खान्देश भागातील असताना आदिवासी असल्याचा आरक्षणाचा फायदा त्यांनी घ्यायचा व आम्हाला मिळू द्यायचा नाही असे षडयंत्र सुरू आहे .त्यासाठी ही संघर्ष यात्रा घेऊन मुंबई येथे निघाली असल्याचा सांगत मंत्रालयात आदिवासी समाजाचे आमदार खासदार व मुख्यमंत्री यांनी आमच्या मागण्यांवर चर्चा करून तात्काळ निर्णय द्यावा अशी मागणी यात्रेचे प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केली आहे .
प्रशासनाचे दुर्लक्ष,पदयात्री जखमी
दहा दिवस रस्त्याने उन्हातान्हाची परवा न करता तब्बल तीनशे किलोमीटर चालत निघाला असताना शासकीय प्रशासनाने या आंदोलनाकडे ढुंकून ही पाहिले नाही फक्त रस्त्यात पोलिस प्रशासनाने वेळोवेळी मदत केली अशी खंत शाना भाऊ सोनवणे यांनी बोलून दाखवली.तर या पदयात्रे मध्ये चालून चालून अनेकांच्या पायांना जखमा झाल्या आहेत.त्यामध्ये शनिवारी रात्री काही महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पडघा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.