शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसींसाठी संघर्ष समितीचे ढोल बजाव आंदोलन
By महेश गलांडे | Published: November 3, 2020 05:50 PM2020-11-03T17:50:25+5:302020-11-03T17:51:02+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी उद्भवलेल्या महाराष्ट्रातील ओबीसी आणि एकंदरीत सर्वसामान्य विद्यार्थी, परिक्षार्थी आणि सरळसेवा भरती प्रक्रियेवर परिणाम झालेला दिसून येत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
ठाणे : येथील ओबीसी-व्हीजेएनटी प्रवर्गाच्या कार्यकर्त्यांनी संवैधानिक न्याय्य हक्काच्या मागण्या मंजूर करण्याच्या मागणीसाठी ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे नेते दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी ठाणे तहसिलदार कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले आहे. ओबीसींच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ओबीसी व अन्य सामाजिक संघटनांच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. त्याचा एक भाग म्हणून आज हे ढोल बजाव आंदोलन पाटीय, यांच्या नेतृत्वाखाली येथे छेडण्यात आले आहे. ओबीसींचे सर्व प्रश्न सुटेपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन सुरू राहणार असल्याचे नियोजन या संघर्ष समितीने केले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी उद्भवलेल्या महाराष्ट्रातील ओबीसी आणि एकंदरीत सर्वसामान्य विद्यार्थी, परिक्षार्थी आणि सरळसेवा भरती प्रक्रियेवर परिणाम झालेला दिसून येत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. ओबीसींच्या समस्या जाणून घेण्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधीसमवेत या आधी मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित करून त्या समजून घेतल्या आहेत. यात ठरल्याप्रमाणे पुढील मंत्रीमंडळ बैठकीत ओबीसींचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली. आजच्या या आंदोलनाद्वारे तरी ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही व्हावी या मागणीसह यापुढील जनगणना जातनिहाय करण्यात यावी, ओबीसी या प्रवर्गात मराठा जातीचा समावेश करू नये, पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा व भरती प्रक्रिया विनाविलंब सुरू करण्यात याव्यात आदी मागण्यांचा यात समावेश आहे.