छातीत दुखू लागल्याने संजय भोईर ठाणे सिव्हिल रुग्णालयात ; प्रकृती बऱ्यापैकी सुधारणा
By अजित मांडके | Published: February 25, 2023 07:11 PM2023-02-25T19:11:21+5:302023-02-25T19:11:31+5:30
सेवा कर जमा केला परंतु सरकारला जीएसटी न भरल्याचा ठपका ठेवत ठामपा माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांना गुरुवारी २३ फेब्रुवारीला जीएसटी भिवंडी आयुक्तालयाने अटक केली.
ठाणे : जीएसटी चुकविल्याप्रकरणी अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत असलेले ठामपा माजी नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना दम आणि छातीत दुखू लागल्याने तसेच बीपी वाढल्याने त्यांना शुक्रवारी रात्री ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले असून त्यांची प्रकृती आता बऱ्यापैकी स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सेवा कर जमा केला परंतु सरकारला जीएसटी न भरल्याचा ठपका ठेवत ठामपा माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांना गुरुवारी २३ फेब्रुवारीला जीएसटी भिवंडी आयुक्तालयाने अटक केली. त्यांना न्यायालयाने येत्या ९ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोठडीत असताना, शुक्रवारी २४ फेब्रुवारीला भोईर यांना दम लागू लागला. तसेच छातीतही दुखू लागले त्याचबरोबर बीपी ही वाढल्याने कारागृहातील डॉक्टरांच्या सल्लयानुसार भोईर यांना रात्री ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यातच भोईरांना मधुमेह ही असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. रुग्णालयात आणल्यावर तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू झाल्याने शनिवारी त्यांच्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सद्यस्थितीत त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांमार्फत योग्य उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.