ठाण्यातील चिखलवाडीसह संजय गांधी राष्ट्रीय उदयानात पाेलिसांचे माॅकडील
By जितेंद्र कालेकर | Published: May 9, 2023 07:41 PM2023-05-09T19:41:13+5:302023-05-09T19:41:26+5:30
पाण्यात अडकलेल्या रहिवाशांना काढले बाहेर, ट्रेकिंगला गेलेल्या पर्यटकांची सुटका
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पावसाचे पाणी साठल्यामुळे नाैपाडयातील चिखलवाडी भागात अडकलेल्या रिहवाशांची तसेच संजय गांधी राष्ट्रीय उदयानात भूस्खलन झाल्यामुळे ट्रेकिंगला गेलेल्या पर्यटकांची ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दल आणि पोलिसांनी सुटका केल्याची माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. या घटनेत सर्व यंत्रणांनी चांगल्या प्रकारे तत्परता दाखविली.
नाैपाड्यातील काेपरी ब्रिजसमाेर सार्वजिनक शाैचालयाजवळ चिखलवाडी भागात मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने रहिवाशी अडकले आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाेलीस नियंत्रण कक्षातून मिळाली. ही मािहती मिळताच घटनास्थळी नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तसेच नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान एका इमर्जन्सी टेंडरसह दाखल झाले हाेते.
साधारण, अर्ध्या तासात पाेलिसांनी राबवलेली ही आपत्ती व्यवस्थापनाची माॅकड्रील अथार्त रंगीत तालीम यशस्वी झाल्याचे नाैपाडा पाेलिसांनी सांगितले. या घटनेत काेणलाही दुखापत झाली नाही. त्याचप्रमाणे कापूरबावडी पाेलिसांनीही ९ मे राेजी ११ वाजण्याच्या सुमारास अशीच रंगीत तालीम घेतली. काेलशेत वरचा गाव भागात गणपती विसर्जन घाटाजवळ कोलशेत खाडीमध्ये बोट पलटी होऊन सात ते आठ बुडाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली हाेती. घटनास्थळी कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या पथकासह आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान एका इमर्जन्सी टेंडरसह उपस्थित होते. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. पाण्यात बुडालेल्या सवार्ंना सुमारे एक तासात १२ वाजण्याच्या सुमारास सुखरुप बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, मानपाडा भागातील टिकुजिनी वाडी येथील संजय गांधी राष्ट्रीय उदयानात मंगळवारी सकाळी ११.५६ वाजण्याच्या सुमारास भूस्खलन होऊन ट्रेकिंगसाठी गेलेले काही लोक डोंगरावर अडकल्याची माहिती मिळाली हाेती. त्याआधारे चितळसर-मानपाडा पाेलिसांसह आपत्ती व्यवस्थापन पथक, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी धाव घेत दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास अडकलेल्या पर्यटकांची सुटका केली.