संजय घरत लाच प्रकरण : लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर दबाव?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:31 AM2018-06-16T06:31:16+5:302018-06-16T06:31:16+5:30
लाचखोरी प्रकरणात अटकेत असलेले केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने छापे टाकले. पण, या कारवाईला ४८ तास उलटूनही एसीबीने कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
कल्याण - लाचखोरी प्रकरणात अटकेत असलेले केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने छापे टाकले. पण, या कारवाईला ४८ तास उलटूनही एसीबीने कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. घरत यांचे थेट मंत्रालयापर्यंत कनेक्शन असल्याने तपासकामात त्यांच्यावर दबाव येत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
बेकायदा बांधकाम अधिकृत करण्याच्या बदल्यात आठ लाख रुपयांची लाच घेताना घरत यांना अटक झाली आहे. घरत यांच्याबरोबर भूषण पाटील, ललित आमरे हे लिपिक आणि नारायण परुळेकर यांनाही गजाआड करण्यात आले आहे. घरत तपासकामात सहकार्य करत नसल्याचे न्यायालयात सांगण्यात आले आहे. घरत यांचे कार्यालय, घरांवर छापे टाकण्यात आले. त्यात मोठ्या प्रमाणावर घबाड हाती लागले आहे. पालिकेतील काही कागदपत्रे आणि फायली त्यांच्या घरात सापडल्याचीही सूत्रांची माहिती आहे. परंतु, याबाबत तपास यंत्रणांनी मौन बाळगले आहे. घरत यांचे राजकीय पुढाऱ्यांशी लागेबांधे आहेत. थेट मंत्रालयापर्यंत संपर्क असलेल्या घरत यांच्या दालनात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचीही ऊठबस असायची. अतिरिक्त आयुक्तपद घरत यांना मिळवून देण्यात त्यांचीच शिफारस कामाला आली. त्यात, मोजक्याच मंडळींना त्यांच्या दालनात प्रवेश असायचा. यात माहिती अधिकार कार्यकर्त्यांचाही समावेश होता.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असलेला तपास पाहता त्यांच्या तपासकामावर दबाव येत आहे की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. यासंदर्भात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त दीपक दळवी यांनी मात्र दबाव असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. आमचा तपास सुरू असून योग्य वेळी माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
‘त्या’ तक्रारीचे काय झाले?
विवरणपत्रात पत्नीच्या नावाची मालमत्ता दडवल्याप्रकरणी घरत यांच्याविरोधात कल्याणमधील नागरिक सुलेख डोण यांनी नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती. यावर केडीएमसीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. सध्या घरत यांच्या मालमत्तेसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू आहे. संबंधित विभागाने केडीएमसीकडे समन्वयक अधिकारी देण्याची मागणी केली. त्याची प्रशासनाकडून आजवर अंमलबजावणी झाली नाही. डोण यांनी घरत यांच्या पत्नीच्या नावे वाडा तालुक्यातील मौजे केळवण आणि भिवंडी तालुक्यातील मालमत्तेचा विवरणपत्रात उल्लेख नसल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
सत्ताधा-यांचे भ्रष्टाचाराला खतपाणी
केडीएमसीमध्ये २० वर्षांहून अधिक सत्ता शिवसेना-भाजपा युतीची राहिली आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर लाच प्रकरणात अधिकारी आणि कर्मचारी अटक झाले आहेत. परंतु, अद्यापही त्याची मालिका सुरूच असल्याचे घरत यांच्या निमित्ताने पुन्हा समोर आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार अधिकाºयांकडून होत असतानाही यावर ठोस कारवाईची कृती होण्याऐवजी सत्ताधाºयांकडून भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्याचेच स्पष्ट होत आहे.