संजय रोकडे खून प्रकरण : पाच आरोपींना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 03:24 AM2018-01-24T03:24:11+5:302018-01-24T03:24:37+5:30
चार वर्षांपूर्वी झालेल्या शिवसैनिक संजय रोकडे यांच्या हत्येप्रकरणी पाच आरोपींना ठाणे न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
ठाणे : चार वर्षांपूर्वी झालेल्या शिवसैनिक संजय रोकडे यांच्या हत्येप्रकरणी पाच आरोपींना ठाणे न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पाच आरोपींमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. मंगेश देविदास जाधव, मनिष देविदास जाधव, नीलेश खंडू कटारे, मनोज जयराम सोनवणे आणि गणेश नारायण देवाडिगा अशी त्यांची नावे आहेत.
ठाण्यातील शासकीय मनोरुग्णालयात नोकरीला असलेले संजय रोकडे हे शिवसैनिक होते. त्यांचे आणि आरोपींचे जुने वैर होते. एका खून प्रकरणामध्ये संजय रोकडे यांनी आरोपींविरुद्ध न्यायालयासमोर साक्ष नोंदविली होती. त्यामुळे या आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून आरोपी आणि संजय रोकडे यांच्यात वैर निर्माण झाले होते. मधल्या काळात संजय रोकडे आणि आरोपींनी एकमेकांविरुद्ध काही तक्रारीही पोलिसांकडे दाखल केल्या. संजय रोकडे आधी टेकडी बंगला भागात वास्तव्यास होते.
आरोपींकडून मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागल्याने ते चरई भागात राहण्यास आले. मात्र आरोपी त्यांच्यावर नजर ठेवून होते.
२२ जुलै २०१४ रोजी सायंकाळी ठाण्यातील तीन पेट्रोलपंपांजवळ आरोपींनी रोकडे यांना गाठले. लोखंडी रॉड आणि इतर शस्त्रांनी आरोपींनी रोकडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात रोकडे यांचा मृत्यू झाला.
नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र थोरवे यांनी या प्रकरणाचा तपास केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. कदम यांच्या न्यायालयासमोर हा खटला चालला.
या प्रकरणाच्या तपासामध्ये तपास अधिकाºयाने केलेल्या अक्षम्य हलगर्जीवर न्यायालयाने कठोर ताशेरे ओढले असून, सरकारी वकिलाच्या भूमिकेची प्रशंसा केली. जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी या प्रकरणी २० साक्षीदार तपासले. तपास अधिकाºयाच्या भूमिकेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असताना, फड यांनी वेगवेगळ्या खटल्यांचे दाखले न्यायालयासमोर मांडून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली. त्यानुसार सर्व साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने पाचही आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी १0 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.