‘त्याने’ स्थापन केली चिंतामुक्त अंत्यसंस्कारासाठी खासगी कंपनी, २ हजार कोटींची उलाढाल करणार?
By अजित मांडके | Published: November 12, 2022 05:44 AM2022-11-12T05:44:33+5:302022-11-12T05:45:10+5:30
मुंबईतील संजय रामगुडे यांना या चिंतेतच व्यवसायाची संधी दिसली.
ठाणे :
मूलबाळ नसलेली वृद्ध दाम्पत्य, परदेशात मुले-मुली असल्याने एकाकी असलेले वृद्ध आई-वडील, अंथरूणाला खिळलेल्या व्यक्तींना मृत्यूनंतर आपल्यावर विधिवत अंत्यसंस्कार कोण करणार, अशी चिंता मनोमन कुरतडते. मुंबईतील संजय रामगुडे यांना या चिंतेतच व्यवसायाची संधी दिसली. त्यासाठी कंपनी स्थापन करून त्यांनी अशा निराधारांच्या अंत्यसंस्काराचे कंत्राट घ्यायला सुरूवात केली. आजवर पाच हजार व्यक्तींवर त्यांनी या पद्धतीने अंत्यसंस्कार केले आहेत. या चिंतामुक्त अंत्यसंस्कारातून ५० लाखांची उलाढाल झाली असून बदलत्या जीवनशैलीमुळे येत्या काळात ती २,००० कोटींवर जाईल, असा त्यांना विश्वास आहे.
मुंबईत रामगुडे यांच्या सुखांत फ्युनरल मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीची मुख्य शाखा आहे. त्यांच्याकडे सुमारे २० कर्मचारी कार्यरत आहेत. रामगुडे कित्येक वर्षांपासून सिनेसृष्टीत निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते. ३० वर्षांपूर्वी वाराणसीत चित्रपटाच्या शूटिंगनिमित्ताने ते गेले असता, तेथील घाटावर सुरू असलेल्या मरणोत्तर विधींनी त्यांचे लक्ष वेधले. यातूनच कंपनी स्थापन करण्याची कल्पना त्यांना सुचली. त्यानंतर मरणोत्तर सर्व प्रक्रियेचा अभ्यास करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यातूनच आठ वर्षांपूर्वी कंपनी सुरू केली. सध्या संपूर्ण देशात अशा प्रकारचे काम करणारी ही एकमेव कंपनी असल्याचा दावा ते करतात.
नातलगाचे निधन झाल्याचे समजल्यानंतरही अनेकांना धकाधकीच्या जीवनात तिकडे जाता येत नाही. मरणानंतरचे सर्व सोपस्कार करण्यासाठी माहिती असलेली माणसे मिळत नाहीत. रामगुडे यांच्या कंपनीकडे तुम्ही अगोदर नोंदणी केली, तर निधनाची माहिती मिळाल्यावर अवघ्या एका तासात कंपनीची टीम तेथे पोहोचून तिरडी बांधण्यापासून स्मशानभूमीत नाव नोंदणीची कामे सुरू करते. ज्यांच्या त्यांच्या समाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले जातात, असे ते सांगतात. तसेच मरणोत्तर मोक्षप्राप्तीसाठी त्यांची टीम प्रार्थना करते.
सुखांत मृत्यू... या आहेत सुविधा
वृद्ध दाम्पत्य, विदेशात
मुले असलेल्यांची सोय
अंत्यसंस्काराचा
व्हिडिओ घरपोच
मृत्यू प्रमाणपत्र
पाठवण्याची सुविधा
आई- वडिलांचा फोटोही देण्याची व्यवस्था
इच्छा असेल तेथे होणार अस्थी विसर्जन
मरणोत्तर मोक्षप्राप्तीसाठी प्रार्थना
२,००० कोटींचे लक्ष्य
आतापर्यंत पाच हजार जणांवर अंत्यसंस्कार.
मृत्यूनंतर आपले अंत्यसंस्कार नीट हाेण्यासाठी १५०० जणांनी केले ॲडव्हान्स बुकिंग.
कोरोना काळात रामगुडे यांनी स्वत: केले २६० जणांचे अंत्यसंस्कार.
या योजनेचे पाच लाख मेंबर करण्याचा मानस. त्यातून
२,००० कोटींची उलाढाल करण्याचे स्वप्न.
हा संपूर्ण व्यवसाय टॅक्स फ्री असल्याचा दावा.
दोन प्रकारच्या सेवा
जर आधीच बुकिंग करून सर्व सुविधांसाठी मेंबर झालात, तर ३७,७०० रूपये.
फक्त अंत्यसंस्कारासाठी टीम बोलावली, तर ८,५०० ते १२,५०० रूपये.