संजय राऊतांनी महायुतीची काळजी करु नये, आनंद परांजपे यांनी दिला सबुरीचा सल्ला
By अजित मांडके | Published: March 29, 2024 05:15 PM2024-03-29T17:15:35+5:302024-03-29T17:17:32+5:30
लोकसभेच्या जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील राऊतांनी या बद्दल काळजी करु नये असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.
अजित मांडके,ठाणे : संजय राऊत यांना विनंती आहे की, आजपर्यंत महाविकास आघाडीच्या ज्या काही बैठका झाल्या तिथे महाविकास आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या काय कुस्त्या झाल्या हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. त्यामुळे पालघर व ठाणे या दोन्ही जिल्ह्यांमधील चारही लोकसभेच्या जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील राऊतांनी या बद्दल काळजी करु नये असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.
अरुणाचल प्रदेश येथील होणाऱ्या विधानसभेच्या व लक्षद्वीपमधील लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या सर्व उमेदवारांना घड्याळ हे चिन्हच मिळणार तसेच पालघर व ठाणे या दोन्ही जिल्ह्यांमधील चारही लोकसभेच्या जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लक्षद्वीपमध्ये घड्याळ हे चिन्ह मिळणार नाही अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्र आणि नागालँड मध्ये राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यताप्राप्त पक्ष आहे.
पॅरा १० इलेक्शन्स सिंबल रिझर्वेशन अँड ॲलॉटमेंट ऑर्डर १९६८ च्या आदेशान्वये केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही अर्ज केला होता. अरुणाचल प्रदेश येथे होणाºया विधानसभेच्या सर्व जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या सर्व उमेदवारांना घड्याळ हे चिन्ह मिळणार आहे. त्याचप्रमाणे लक्षद्वीपमधील लोकसभा निवडणुकीत देखिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना घड्याळ हे चिन्हच मिळणार आहे. तशाप्रकारची अधिसूचना २३ मार्चला अरुणाचल प्रदेश बद्दल निवडणूक आयोगाने काढली आहे. तसेच लक्षद्वीपबद्दलही काढण्यात आली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून खोडसाळपणे एक ज्येष्ठ नेते जे कायम हे वाक्य वापरतात की टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायचा असतो.
चुकीच्या माहितीवर आधारित कार्यक्रम करायला गेलो की कार्यक्रम इनकरेक्ट होतो. हे या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने लक्षात ठेवावे तसेच कुठल्याही प्रकारचे गैरसमज पसरवू नये अशी विनंती देखील त्यांनी केली.