संकरा नेत्रालय ठाण्यातच होणार
By admin | Published: November 14, 2015 11:50 PM2015-11-14T23:50:01+5:302015-11-14T23:50:01+5:30
संकरा नेत्रालयाच्या मुद्यावरून सुरू झालेले वादळ आता शमण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. लोकशाही आघाडीने केलेल्या आरोपानंतर आयुक्तांनी या नेत्रालयाचा
ठाणे : संकरा नेत्रालयाच्या मुद्यावरून सुरू झालेले वादळ आता शमण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. लोकशाही आघाडीने केलेल्या आरोपानंतर आयुक्तांनी या नेत्रालयाचा चेंडू ठाणेकरांच्या कोर्टात टोलवला होता. परंतु, ते ठाण्यात व्हावे, अशी इच्छा ठाणेकरांनीही प्रकट केल्याने अखेर आता आयुक्तांमध्येही मतपरिवर्तन झाले असून लवकरच त्या दृष्टीने पावले उचलली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली.
संकरा नेत्रालय या जगप्रसिद्ध संस्थेला ठाण्यात त्यांचे रु ग्णालय सुरू करण्यासाठी एक रुपया नाममात्र भाड्याने ४ एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला महासभेची गोंधळामध्ये मंजुरीदेखील मिळाली आहे. परंतु, या प्रस्तावात सत्ताधारी मंडळींनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. तसेच या आशयाचे फलकही शहरभर लावले होते. त्यामुळेच आयुक्तांनी हा प्रस्तावच बासनात गुंडाळण्याचा निर्णय घेतला होता. तत्पूर्वी त्यांनी याचा चेंडू ठाणेकरांच्या कोर्टात टाकला होता. तर, या जागेत केवळ रुग्णालयच होणार नसून त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर, रिसर्च सेंटर आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. संकराला जमीन देण्याचा निर्णय झाल्यानंतर तो राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्यानंतर, अंतिम निर्णय होणार आहे. यात ४० टक्के शस्त्रक्रिया मोफत होणार असून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोफत सेवा उपलब्ध होणार आहे. परंतु, असे असतानाही या प्रकल्पाला विरोध झाल्याने आयुक्तांनी याचा निर्णय ठाणेकरांनी घ्यावा, असे स्पष्ट केले होते. अखेर, ठाणेकरांनीही संकराच्या बाजूने कौल दिल्याने आयुक्तांचेही मतपरिवर्तन झाले असून लवकरच या रुग्णालयाच्या कामाचा नारळ फोडला जाणार आहे.