आठ मालिकांच्या चित्रीकरणावर आली संक्रांत; ठाण्यात सुरू होते शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 04:47 AM2020-07-02T04:47:32+5:302020-07-02T04:47:47+5:30
बंदिस्त ठिकाणी काम करू देण्याची निर्माते, दिग्दर्शकांची मागणी
प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या मालिकांचे चित्रीकरण अनलॉकमुळे ठाण्यात पुन्हा सुरू झाले होते. परंतु उद्यापासून पुढील दहा दिवस करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पुन्हा चित्रीकरणाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार चिंतेत आहेत. मालिकांचे इनडोअर शूटिंग होणार असून सर्वांची व्यवस्था सेटवर करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने चित्रीकरणास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.
ठाण्यात सध्या आठ मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सिनेमा, मालिकांचे चित्रीकरण बंद झाले होते. गेले तीन महिने काम नसल्याने हातावर पोट असलेल्या कामगारवर्गाचे प्रचंड हाल झाले. टेलिव्हीजनवर प्रेक्षकांना जुन्या मालिका, मालिकांचे जुने भाग, जुने सिनेमे दाखवले जात होते. प्रेक्षकांनाही तेच तेच पाहून कंटाळा आला आहे. मध्येच बंद पडलेल्या डेलीसोपचे पुढील भाग दाखविण्यात यावे अशी मागणी प्रेक्षकांकडून होत असल्याचे निर्माते/दिग्दर्शकांनी सांगितले. ठाणे शहरात गेल्या चार दिवसांपासून मालिकांच्या चित्रीकरणास सुरुवात झाली. परंतु गुरुवारपासून पुन्हा लॉकडाऊन घोषित केल्यामुळे निर्माते/दिग्दर्शक/कलाकार त्याचप्रमाणे हातावर पोट असलेल्या कामगार वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. जे कलाकार बाहेरून आले आहेत, ते १४ दिवस क्वारंटाइन झाल्यावर सेटवर आले आहेत. मालिकांचे चित्रीकरण सुरू असताना किचनपासून सगळी व्यवस्था ही सेटवर करण्यात येते.
कोणीही बाहेर जात नाहीत, कोणाच्या संपर्कात येत नाहीत. सेटवर कोरोनासंदर्भात पुरेशी काळजी घेतली जात असतानाही मालिकांचे चित्रीकरण बंद का करावे, असा सवाल निर्माते/ दिग्दर्शकांनी केला आहे.
१३ जुलैपासून मालिकांचे नवीन भाग दाखविण्यात येणार होते. कलाकारांऐवजी कामगारांची संख्या कमी केली आणि सरकारच्या सूचनेनुसार ३३ टक्के कामगार वर्गच सेट वर आहे. सकाळी ७ ते सायं. ७ यावेळेत मालिकांचे चित्रीकरण सुरू असते. त्या दरम्यान कोणीही बाहेर जात नाही. तसेच, मालिका सुरू झाल्या की प्रेक्षक टीव्ही समोर बसतील ते बाहेर पडणार नाहीत. लॉकडाऊनला हे फायदेशीर ठरणार आहे. - नितीन वैद्य, निर्माते
‘विठोबा रॉक्स’ या संगीत अल्बमचे चित्रीकरण उपवनला होणार होते. ते लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे रद्द केले. मालिकांचे चित्रीकरण सेटवरच होते. दीड वर्षे कोरोनावर लस येणार नाही. म्हणून तोपर्यंत चित्रीकरण थांबविणार का? सर्व नियम पाळून मालिकांचे चित्रीकरण करणाऱ्यांना परवानगी द्या. - विजू माने, दिग्दर्शक
पुणे, बीड यांसारख्या ठिकाणाहून येणारे कलाकार क्वारंटाइन होऊन मग सेटवर आले आहेत. त्यामुळे पुरेशी दक्षता चित्रीकरणादरम्यान घेतली जात आहे. तसेच सेटवर काम करणाºया कामगारांना इतक्या दिवसांनी काम मिळाले आहे. आधीच बराच आर्थिक फटका बसला आहे. प्रशासनाने मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी द्यावी. - रवी करमरकर, दिग्दर्शक
आमच्या दोन्ही मालिकांचे शूटिंग हे बंगल्यातच होत आहे. आम्ही कोणाच्याही संपर्कात येणार नाही. कलाकार, तंत्रज्ञ हे सेटवरच रहात आहेत. मालिकांचे चित्रीकरण बंद झाले तर टेलिकास्ट पुढे ढकलावे लागेल. - हेमंत सोनावणे, कार्यकारी निर्माते
ठाण्यात ‘माझ्या नवºयाची बायको’ या मालिकेचे गेली तीन वर्षे कोलशेत येथील सोसायटीमध्ये चित्रीकरण सुरु होते. परंतु कोरोनामुळे या मालिकेचे चित्रीकरण नाशिकला एका रिसॉर्टमध्ये केले जात आहे. सोसायटीतील लोकांना त्रास नको म्हणून जागा बदलली असल्याचे या मालिकेचे कार्यकारी निर्माते हेमंत सोनावणे यांनी सांगितले.