संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी यंदाही रद्द; 'आरोग्य उत्सव' साजरा होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 02:32 PM2021-08-27T14:32:24+5:302021-08-27T14:35:08+5:30
Sanskriti Pratishthan Dahihandi : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी रद्द करण्यात आली असून याऐवजी 'आरोग्य उत्सव' साजरा होणार आहे. यासंदर्भातील माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
ठाणे : ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठान दरवर्षी मोठ्या प्रमाणात दहीहंडीचे आयोजन करतात. संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी जगप्रसिद्ध आहे. मात्र यंदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता दहीहंडी उत्सवावर अनेक निर्बंध आणले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी रद्द करण्यात आली असून याऐवजी 'आरोग्य उत्सव' साजरा होणार आहे. यासंदर्भातील माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी जगप्रसिद्ध आहे. कोरोनाचे सावट अजून आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबई ठाण्यातही रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे यावर्षीही आमची दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. याऐवजी 'आरोग्य उत्सव' साजरा करणार आहोत. पण, रात्री १२ वाजता दहीहंडीचा छोटा उत्सव साजरा करु, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
याचबरोबर, ठाण्यामुळे जगात दहीहंडी उत्सव पोहोचला. ठाणे दहीहंडीचे माहेर घर आहे. हा उत्सव रद्द करणे, हे आम्हाला त्रासदायक आहे. पण लोकांच्या जीवाशी खेळ न करता यंदा आम्ही दहीहंडी रद्द करत आहोत. गोविंदांच्या जीवाशी आयोजकांनी खेळू नये. आयोजकांना विनंती आहे की, त्यांनी दहीहंडीचे आयोजन करु नये. काही जण निवडणूका डोळ्यासमोर दहिहंडी साजरी करतात. दहीहंडीमध्ये गाजावाजा करतात पण नंतर कुठेच दिसत नाहीत असे म्हणत प्रताप सरनाईक यांनी मनसेला टोला लगावला.
आजही 'या' वक्तव्यावर ठाम - प्रताप सरनाईक
शिवसेनेने भाजपाशी जुळवून घ्यावे नाही तर शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर मंत्र्यांवर गुन्हे दाखल होतील, केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागेल, असे पत्र प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. यावर बोलताना प्रताप सरनाईक यांनी शिवसेना आणि भाजपाने एकत्रित यावे या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे, असे सांगितले. दरम्यान, प्रताप सरनाईक यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी मी एवढा मोठा नाहीये अशी प्रतिक्रिया दिली.