निवडणूक फंडासाठी संतोष देशमुखची हत्या; जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपाने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 00:21 IST2025-01-04T00:20:08+5:302025-01-04T00:21:45+5:30
ठाणे खाडी किनारी मार्गाचा ठेका रद्द करण्याची मागणी करत आवश्यक परवानगी आधीच कंत्राट कसे दिले? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.

निवडणूक फंडासाठी संतोष देशमुखची हत्या; जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपाने खळबळ
ठाणे : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या निवडणूक फंडासाठीच झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. आव्हाड यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली.
ठाण्यातही पर्यावरण तसेच आवश्यक परवानगी मिळण्याआधीच ठाणे खाडी किनारी मार्गाचे कंत्राट कसे दिले? असा प्रश्न उपस्थित करीत निवडणुक निधीसाठी परवानगी आधी प्रकल्पाचे कंत्राट दिल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला.
या कामाचे कार्यादेश रद्द करून पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी असून, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला तर, त्यांच्या कामातील पारदर्शकता दिसेल, असे आव्हाड म्हणाले.
या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही आणि जनतेला उत्तम मार्गही मिळेल, याची खबरदारी नवे कंत्राट देताना घेतली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.
ठाण्यातील वाहतूक कोंडीग्रस्त मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून बाळकुम ते गायमुख असा खाडी किनारी मार्ग उभारला जाणार आहे. या मार्गाचा प्रकल्प आराखडा ठाणे महापालिकेने तयार केला आहे, तर एमएमआरडीए मार्फत या मार्गाच्या उभारणीचे काम केले जाणार आहे.
या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून एमएमआरडीएने ठेकेदार निश्चित करून संबंधित ठेकेदाराला कामाचा कार्यादेश दिला आहे. मात्र, परवानगी मिळण्याआधीच कामाचा कार्यादेश दिल्याने प्रकल्पाचे काम वादात सापडले आहे.
याच संदर्भात आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुक निधीसाठी परवानगी आधी प्रकल्पाचे कंत्राट दिल्याचा आरोप केला. बीडचे प्रकरणही निवडणूक निधीसाठीच घडले आणि आता खाडी किनारी मार्गाचे कंत्राटही निवडणुक निधीसाठी काढल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.
सुरुवातीला प्रकल्पाचा खर्च १३०० कोटी होता. त्यात वाढ होऊन तो आता २७०० कोटी इतका झाल्याचेही आव्हाड म्हणाले. खाडी किनारा मार्गाच्या उभारणीसाठी तिवारांच्या जंगलांची बेसुमार कत्तल होऊ शकते, तसेच सागरी किनारा नियमनाचे कठोर कायदे, नौदलाच्या जागेला खेटून मार्ग उभारला जात असल्यामुळे संरक्षण विभागाचीही परवानगी आवश्यक असल्याचेही आव्हाड म्हणाले.
ठाणेकरांना धरण हवे आहे
ठाणे शहरात सर्वत्र पाणी टंचाईची समस्या असल्यामुळे या मुलभूत सुविधेवर लक्ष देणे गरजेचे आहे. शाई धरणाचा प्रस्ताव एमएमआरडीकडेच आहे. त्यावर कोणताही निर्णय होत नाही. पण, परवानगी आधी खाडी किनारी मार्ग उभारणीसाठी घाई केली जात आहे, असा आरोपही आव्हाड यांनी केला.