सानुग्रह अनुदानाचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात; २५ हजार सानुग्रह अनुदानाची मागणी
By अजित मांडके | Published: November 1, 2023 04:03 PM2023-11-01T16:03:00+5:302023-11-01T16:03:32+5:30
आता कर्मचाऱ्यांच्या आश्वासक असे सानुग्रह अनुदान मंजूर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ठाणे : येत्या काही दिवसांवर दिवाळी आली असल्याने ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे या मागणीसाठी महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या यूनियन आक्रमक झाल्या आहेत. महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता याचे नियोजन कसे करावे असा पेच तूर्तास महापालिकेला सतावत आहे. परंतू सानुग्रह अनुदानासाठी येणारा खर्च पालिकेला पेलावा लागणार आहेच. त्यात आता सानुग्रह अनुदान किती द्यावे या बाबतचा निर्णय आता महापालिकेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात टोलवला आहे. आता कर्मचाऱ्यांच्या आश्वासक असे सानुग्रह अनुदान मंजूर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ठाणे महापालिकेत ८५०० च्या आसपास कर्मचारी आहेत. तसेच कंत्राटी स्वरुपात अडीच हजारांच्या आसपास कर्मचारी वर्ग आहे. तसेच ठाणे परिवहन सेवा, बालवाडी आदींसह इतर कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान द्यावे लागणार आहे. मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार सानुग्रह अनुदान मिळाले होते. यंदा म्यूनिसीपल लेबर युनियनने २५ हजार रुपये मिळावे अशी मागणी लावून धरली आहे. त्यावर अदयाप काही तोडगा निघालेला नाही. मागील वर्षी १८ हजार या प्रमाणे पालिकेच्या तिजोरीवर साधारपणे १६ ते १८ कोटींचा बोजा पडला होता अशी माहिती पालिकेतील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. आता २५ हजार रुपयांची मागणी झाल्याने ती तरी पूर्ण होऊ शकणार नाही. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एक ते दोन हजारांची वाढ यात अपेक्षित धरण्यात आली आहे. तसे झाल्यास साधारपणे १९ ते २० हजारांच्या आसपास सानुग्रह अनुदान पालिका कर्मचाऱ्यांना मिळू शकणार आहे. तसेच कंत्राटी स्वरुपातील कर्मचाऱ्यांना एक पगार मिळू शकणार आहे. तसे झाल्यास पालिकेच्या तिजोरीवर भार हा २७ ते ३० कोटींच्या आसपास जाऊ शकणार असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली आहे.
ठाणे महापालिकेची सध्या आर्थिक परिस्थिती पाहता, उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यात अद्यापही पालिकेला यश आलेले नाही. त्यातही तिजोरीत जेमतेम रक्कम शिल्लक आहे. त्यामूळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याची पालिकेची इच्छा असली तरी ती किती गोड करावी याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच घ्यावा असे मानले जात आहे. मागील वर्षी देखील शिंदे यांनी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली होती. यंदा देखील आता मुख्यमंत्री शिंदे हे जी रक्कम निश्चित करतील ती पालिकेला अदा करावी लागणार आहे. पंरतू सध्या शिंदे यांच्या व्यस्त कार्यक्रमामूळे पालिकेला देखील त्यांच्या सोबत चर्चा करता आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र येत्या दोन तीन दिवसात चर्चा होऊन पूढील आठवड्यात पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होईल असा आशावाद पालिकेने व्यक्त केला आहे.