सोशल मीडियामुळे बोटांचे ओठ आणि ओठावर बोट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:31 AM2017-07-31T00:31:05+5:302017-07-31T00:31:05+5:30
हल्लीचा जमाना हा व्हॉट्सअॅप, फेसबुकचा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण भरपूर वाचतो आणि भरभरून बोलतो. त्यामुळे बोटांचे ओठ आणि ओठावर बोट
ठाणे : हल्लीचा जमाना हा व्हॉट्सअॅप, फेसबुकचा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण भरपूर वाचतो आणि भरभरून बोलतो. त्यामुळे बोटांचे ओठ आणि ओठावर बोट, अशी आपली अवस्था झाली आहे. विशेषत: तरुणाई या मीडियाच्या आहारी गेलेली दिसते. मात्र, तरुणांनी प्रत्यक्ष पुस्तके वाचणे आणि त्यावर आपले विचार व्यक्त करणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ लेखक, कवी प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले.
आनंद विश्व गुरुकुल येथे मराठी वाङ्मय मंडळाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गेल्या काही दिवसांत तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या करतात, त्याचप्रमाणे तरुणांनाही जगावेसे वाटत नाही, हे मोठे दु:ख आहे. जीवन संपवण्याची इर्षा जर जीवन जगण्यासाठी कामी आणली, तर जीवन अधिक प्रेरणादायी होईल. वाङ्मयाची गोडी लागण्यासाठी भाषेवर प्रेम केले पाहिजे. शब्दांच्या वेगवेगळ््या छटा टिपता आल्या पाहिजे. भाषा उच्चारणातूनच आपली खरी ओळख होते. भाषा आपल्याकडून निसटणे म्हणजे एक प्रकारे जीवन निसटणे होय, असेही ते म्हणाले.
सोहळ्याच्या उत्तरार्धात दवणे यांनी भाषेची आनंदयात्रा हा कार्यक्रम सादर केला. याअंतर्गत त्यांनी कुसुमाग्रज, बा.भ. बोरकर यांच्यासह स्वत:च्याही काही कविता सादर केल्या. तसेच काही लेखकांच्या साहित्यातील उताºयांचे वाचन केले. कविता म्हणजे काय, ती कशी तयार होते, हेसुद्धा दवणे यांनी सांगितले.