४५ गुन्हे दाखल असलेला सराईत सोनसाखळी चोरटा जेरबंद; १० गुन्हे उघडकीस
By अजित मांडके | Published: August 26, 2024 03:44 PM2024-08-26T15:44:53+5:302024-08-26T15:45:24+5:30
१० गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील ०३ लाख १३ हजार ३२५ रुपये किंमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. तो कल्याण,आंबिवली येथे राहणार आहे.
ठाणे : ठाणे, मुंबईच नाहीतर पुणे,नाशिक, अहमदनगर, गुजरात, तामिळनाडू या शहरातील पोलीस ठाण्यात तब्बल ४५ गुन्हे दाखल असलेला गुलामअली उर्फ नादर सरताज जाफरी (४०) याला कापूरबावडी पोलीस ठाण्यामधील गुन्ह्यात ठाणे पोलीस दलातील वागळे युनीट -५ ने जेरबंद केले. त्याच्याकडून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील १० गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील ०३ लाख १३ हजार ३२५ रुपये किंमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. तो कल्याण,आंबिवली येथे राहणार आहे.
कापूरबावडी पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याचा समांतर तपास वागळे युनीट- ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सराईत सोनसाखळी चोरट्याला ताब्यात घेतले. जाफरी हा एकट्या दुकट्या महिलेला टार्गेट करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पलायन करायचा. तसेच त्याच्यावर यापूर्वीही महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू या सारख्या राज्यात अशाप्रकारे एकूण ४५ गुन्हे दाखल असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली.