मोबाइल चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: April 16, 2024 08:37 PM2024-04-16T20:37:31+5:302024-04-16T20:37:48+5:30
बदलापुरातील चैतन्य संकुलामधील किशोर मानकर (४५) हे २५ मार्च, २०२४ रोजी दुपारी ३च्या सुमारास धूलिवंदन सणानिमित्त आंघाेळीसाठी आंबेशिव नदीवर गेले होते.
ठाणे : मोबाइलची चोरी करणाऱ्या भाविक महेंद्र सिंग (वय २२, रा.अंबरनाथ, ठाणे) याला ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी मंगळवारी दिली. त्याच्याकडून चोरीतील १० हजारांचा मोबाइलही हस्तगत करण्यात आला आहे.
बदलापुरातील चैतन्य संकुलामधील किशोर मानकर (४५) हे २५ मार्च, २०२४ रोजी दुपारी ३च्या सुमारास धूलिवंदन सणानिमित्त आंघाेळीसाठी आंबेशिव नदीवर गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांचा मोबाइल त्यांच्या स्कूटरच्या डिक्कीमध्ये ठेवला होता. तो चोरट्याने पळवला होता. या प्रकरणी कुळगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. अलीकडेच ठाणे ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ.डी.एस. स्वामी यांनी दिले होते.
याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी विविध पथके तयार केली होती. याच पथकाला एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे तांत्रिक तपास करून कोणताही धागा नसताना, यातील चोरटा भाविक सिंग याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील चौकशीमध्ये त्याने या मोबाइल चोरीची कबुली दिली. उपनिरीक्षक महेश कदम, हवालदार प्रकाश साईल, संतोष सुर्वे, प्रवीण हाबळे, सतीश कोळी आणि हेमंत विभुते आदींच्या पथकाने हा तपास केला.