सरस्वती सेकंडरी स्कूलच्या जुन्या वास्तूला जल्लोषात निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 06:25 AM2018-04-07T06:25:34+5:302018-04-07T06:25:34+5:30
सरस्वती सेकंडरी स्कूलची सुमारे ५३ वर्षे जुनी इमारत पुनर्बांधणीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. सध्याच्या उन्हाळी सुट्यांच्या काळात येत्या १० एप्रिलला इमारत पाडायला सुरुवात होणार असून पुढील दोन वर्षांत शाळेची सुसज्ज, अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक इमारत बांधून पूर्ण होईल.
ठाणे - सरस्वती सेकंडरी स्कूलची सुमारे ५३ वर्षे जुनी इमारत पुनर्बांधणीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. सध्याच्या उन्हाळी सुट्यांच्या काळात येत्या १० एप्रिलला इमारत पाडायला सुरुवात होणार असून पुढील दोन वर्षांत शाळेची सुसज्ज, अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक इमारत बांधून पूर्ण होईल. यादरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, असा विश्वास संस्थेच्या विश्वस्त मंडळाला आहे. या जुन्या वास्तूला आनंदाने निरोप देण्यासाठी ‘निरोपाचा जल्लोष’ कार्यक्रम रविवारी शाळेच्याच आवारात रंगणार आहे.
ठाण्यातील नौपाडास्थित सरस्वती सेकंडरी स्कूलची स्थापना १९५२ मध्ये उमा नीळकंठ व्यायामशाळेत झाली. १९६४-६५ साली शाळा आपल्या स्वत:च्या वास्तूत भरू लागली. त्याला यंदा ५३ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे साधारण ५० वर्षे होऊन गेलेल्या इमारतीला पुनर्बांधणीची गरज आहे, हे लक्षात घेत आम्ही हा निर्णय घेतल्याचे ट्रस्टचे ज्येष्ठ विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात शाळेची अर्धी इमारत पाडली जाईल. ती बांधून पूर्ण झाल्यावर दुसरा टप्पा राबवला जाईल. नवीन इमारत सहा मजल्यांची असणार आहे. सर्व शासन नियमांना अनुसरून आणि पर्यावरणपूरक अशी ग्रीन इमारत उभारली जाणार आहे. त्या इमारतीत कनिष्ठ महाविद्यालय आणि कला कौशल्य केंद्र नव्याने सुरू केले जाणार आहे. आणखी एक आनंदाची बाब म्हणजे इमारत जास्त मजल्यांची असल्याने मैदानाची जागा आणखी वाढणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सध्या प्रत्येक तुकडीमध्ये ६०-६५ इतका विद्यार्थीपट आहे. मात्र, नवीन इमारत झाल्यावर मुलांकडे शिक्षकांना व्यवस्थित लक्ष देता यावे, या उद्देशाने ३५-४० चा विद्यार्थीपट तयार करण्यात येणार आहे. इंग्रजी माध्यमासाठीही नवीन इमारत मोकळ्या जागेवर उभारली जाणार आहे. मराठी माध्यम इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे १५ कोटी, तर दोन्ही माध्यमाच्या इमारती उभारणीसाठी सुमारे २४ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
हा खर्च ट्रस्ट, आजीमाजी शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक यांच्या माध्यमातून उभा करण्याचा आमचा मानस आहे. तसेच इमारतीसाठी निधी मिळावा यासाठी यादृष्टीने वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार आहे. मात्र, या पुनर्बांधणीनंतर त्या इमारतीत कोणत्याही व्यावसायिक प्रकल्पांना स्थान दिले जाणार नाही, असेही दिघे यांनी सांगितले.