सरपंच, ग्रामसेवकास लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:21 AM2017-07-18T02:21:20+5:302017-07-18T02:21:20+5:30
घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शहापूर तालुक्यातील एका सरपंचासह ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शहापूर तालुक्यातील एका सरपंचासह ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ अटक केली.
शहापूर तालुक्यातील खरवली ग्रामपंचायतीकडे एका ग्रामस्थाचा पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभाचा दुसरा हप्ता थकीत होता. यासाठी या ग्रामस्थाने ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला असता सरपंच यशवंत सोनू वाघ आणि ग्रामसेवक रमेश माधव सासे यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी केली. ग्रामस्थाने याबाबत ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पोलीस उपअधीक्षक अंजली आंधळे यांनी तक्रारीची शहानिशा केली असता आरोपींनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, आरोपींच्या अटकेसाठी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे सोमवारी तक्रारदार ग्रामस्थ २० हजार रुपये लाच घेऊन गेले. या वेळी त्यांच्याकडून लाच स्वीकारताना आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली. याप्रकरणी सरपंच यशवंत सोनू वाघ आणि ग्रामसेवक रमेश माधव सासे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अंजली आंधळे करीत आहेत.