भिवंडीत दोन ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध, तर सहा उमेदवार अर्ज अवैध
By नितीन पंडित | Published: September 29, 2022 07:20 PM2022-09-29T19:20:16+5:302022-09-29T19:21:05+5:30
अर्ज मागे घेण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत
लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींसाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी पार पडली. यामध्ये सरपंच पदाचा एक तर सदस्य पदांचे पाच असे एकूण सहा अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत.तर मोहिली व दुधनी या दोन ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाकरीता प्रत्येकी एक एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवडीच्या घोषणेचे सोपस्कार पूर्ण केले जाणार आहेत.
तालुक्यातील ३१ थेट सरपंच पदाच्या निवडणुकी करीता १३३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते पैकी मोहंडूळ ग्रामपंचायतीच्या एका उमेदवाराचा अर्ज बाद ठरविल्याने आता सरपंच पदासाठी एकूण १३२ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. त्यापैकी पाये, दाभाड, पालखणे, पाच्छापूर, वेढे येथे प्रत्येकी दोन उमेदवार, तर आठ ग्रामपंचायतींमध्ये तीन उमेदवारांनी तर चार ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदा करीता तब्बल आठ उमेदवारांनी सरपंच पदाकरीता उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
२९७ सदस्य पदासाठी ८७२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते त्यापैकी पारीवली,शिरोळे येथील एक एक तर पिंपळघर येथील तीन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले असल्याने सदस्य पदासाठी एकूण ८६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी तीन वाजता पर्यंत असल्याने तो पर्यंत कोण कोणाची मनधरणी करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास गळ घालण्यात यशस्वी होतो त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.