अर्नाळ्यात रेतीचोरी सुुरूच
By Admin | Published: March 11, 2016 02:15 AM2016-03-11T02:15:48+5:302016-03-11T02:15:48+5:30
अर्नाळा समुद्रकिनारी रेती चोरी होत असल्याची सविस्तर माहिती लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतरही रेती चोरी होत नसल्याचा दावा करणाऱ्या महसूल आणि पोलीस खात्याला
शशी करपे, वसई
अर्नाळा समुद्रकिनारी रेती चोरी होत असल्याची सविस्तर माहिती लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतरही रेती चोरी होत नसल्याचा दावा करणाऱ्या महसूल आणि पोलीस खात्याला अर्नाळ्याच्या गावकऱ्यांनी शनिवारी रात्री रेतीची वाहतूक करणारी गाडी पकडून देऊन सणसणीत चपराक लगावली.
अर्नाळा समुद्रकिनारी गेल्या काही वर्षांपासून बेकायदा रेती उत्खनन करून वसईतील विविध भागात चोरटी वाहतूक केली जात आहे. रात्री नऊ ते पहाटे सहापर्यंत रेती चोरीचा धंदा अव्याहतपणे सुरु आहे. पोलीस आणि महसूल अधूनमधून कारवाईचे ढोंग करून गावकऱ्यांची दिशाभूल करीत असतात. पण, कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने रेती चोरी हा येथील मुख्य व्यवसाय बनला आहे.
समुद्रकिनारी एसटी पाडा नावाची मजूरांची मोठी वस्ती आहे. रेती उत्खननासाठी या मजूरांचा वापर केला जातो. एका गोणीमागे प्रत्येकी पाच रुपये मजूरी दिली जाते. रात्रभर वीस पंचवीस मजूर किमान पाचशेच्या आसपास गोण्या भरून रेती काढून किनाऱ्यावर टेम्पोत भरण्याचे काम करतात. रेती वाहतूक करणाऱ्या गाड्यांना कोणताही नंबर किंवा कागदपत्रे नसल्याने गाडी पकडली गेली की ड्रायव्हर गाडी सोडून फरार होतो. पण, नंतर त्याच गाड्याने रेती वाहतूक केली जाते, अशी माहिती उपसरपंच सतीश तांडेल यांनी दिली. मजूरांवर कारवाई झाली की काही स्थानिक नेते त्यांची पोलिसांकडून सुटका करवून घेतात. त्यामुळे रेती चोरांना स्थानिक मजूर सहजपणे उपलब्ध होऊ लागले आहेत.
याठिकाणी नियमितपणे गस्त घातली जाते असे महसूल आणि पोलीस सांगतात. पण, आतापर्यंत गावकऱ्यांनीच रेतीच्या गाड्या पकडून दिल्या आहेत. परवा रात्री चोरटी रेती वाहून नेणारी एक गाडी गावातील काही लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केली. गाडी पकडल्यावर ड्रायव्हर नेहमीप्रमाणे गायब झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कुणावरही कारवाई केलेली नाही.
दरम्यान, भाजपाच्या शिष्टमंडळाने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन गावातील नैसर्गिक समुद्रकिनारा उध्वस्त करणारी रेती चोरी ताबडतोब रोखण्यात यावी अशी मागणी केली. जिल्हा चिटणीस भरत भोईर, तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील, रामदास मेहेर, दयानंद भोईर आणि प्रभाकर वैती यांचा शिष्टमंडळात समावेश होता. रेती चोरीमुळे नैसर्गिक बंधारा उध्वस्त होऊ लागला आहे. किनाऱ्यावर मोठाले खड्डे पडू लागले आहेत. परिणामी मोठी भरती आणि पावसाळ्यात उधाण आले की समुद्राचे पाणी गावात शिरण्याचा धोक आहे, अशी भीती तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.