विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्या १५ जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 02:16 AM2019-12-28T02:16:54+5:302019-12-28T02:17:07+5:30
अंबरनाथमधील घटना : माहेरच्या मंडळींना केली मारहाण
अंबरनाथ : मूळच्या पनवेलमधील घोट गावातील तरुणीचा बुर्दल गावातील तरुणासोबत विवाह झाला होता. विवाह झाल्यावर लागलीच सासरच्यांनी या विवाहितेचा पैशांसाठी छळ सुरू केला. तसेच स्त्रीधन म्हणून आणलेले दागिने स्वत:च्या ताब्यात ठेवले. पैसे न आणल्यास मारहाणही केली जात होती. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या माहेरच्यांनाही मारहाण केली. या प्रकारानंतर या विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेत सासरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
दीपा महेश पाटील हिचा विवाह ११ मे २०१९ रोजी पनवेलच्या घोट गावात झाला. लग्नानंतर लागलीच तिचा सासरच्यांनी छळ सुरू केला. पती महेश हा तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. लग्नानंतर स्त्रीधन म्हणून आलेले दागिने तिच्या ताब्यातून घेतले. सरासरी २१ तोळे सोने सासरच्यांनी स्वत:च्या ताब्यात ठेवत दीपाला माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला. लग्नाला महिनाही झालेला नसताना त्यांचा हा त्रास सुरू झाला होता. पती महेश हा तिच्यावर नेहमी संशय घेऊन तिला मारहाण करायचा.
सासरच्या मंडळींकडून नेहमीच तिच्याकडून कोणत्या ना कोणत्या वस्तूची मागणी केली जात होती. त्यानंतर, त्यांची हाव एवढी वाढली की, त्यांनी थेट माहेरहून १० लाख आणण्यासाठी हट्ट धरला. हे पैसे न आणल्याने त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. १२ डिसेंबरला पती महेशने दीपाला पैसे आणत नाही म्हणून पट्ट्याने मारहाण केली. हा त्रास अनावर झाल्याने तिने आपल्या घरच्यांना हा प्रकार सांगितला.
दीपाचे घरचे आल्यावर त्यांनाही मारहाण करण्यात आली. या सर्व प्रकाराची नोंद हिललाइन पोलीस ठाण्यात करण्यात आली. मात्र, हा प्रकार गंभीर असल्याने दीपा हिने सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. दीपाचे सासरचे लोक हे सातत्याने तिचा छळ करत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती महेश पाटील, सासरा शांताराम पाटील, सासू प्रेमा पाटील यांच्यासह जयेश पाटील, पूजा पाटील, योगेश पाटील, चिंतामण पाटील, कांता पाटील, रामदास पाटील, सुगंधा पाटील, लालचंद पाटील, कविता पाटील, नीरा पाटील, नितीन पाटील आणि जतीन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाही आरोपीला अटक नाही
गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले, तरी अद्याप एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही. आरोपींना अटक होत नसल्याने दीपा आणि तिच्या कुटुंबीयांनी सहायक पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.