जिल्ह्यात पावसाची संतत धार ; बळीराजा सुखावला
By Admin | Published: August 25, 2015 11:40 PM2015-08-25T23:40:05+5:302015-08-25T23:40:05+5:30
जिल्ह्यात रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. याशिवाय धरण क्षेत्रात ही या पावसाचे जोरदार अगमन झाले आहे. या महिन्यातील श्रावण सरींचा अनुभवही
ठाणे : जिल्ह्यात रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. याशिवाय धरण क्षेत्रात ही या पावसाचे जोरदार अगमन झाले आहे. या महिन्यातील श्रावण सरींचा अनुभवही काही अंशी लोप पावल्याची जाणीव झालेली असताना मंगळवारी ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे शहरी व गामीण भागातील जनजीवन सुखावले आहे. घामाच्या धारापासून सुटका झाल्याने समाधान व्यक्त होते आहे.
सकाळी काही अंशी लोकल गाड्यांचे वेळापत्रक पार कोलमडल्यामुळे चाकर मान्याचे हाल झाले. तर महामार्गांवरील वाहतूक कोंडीमुळे चालकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. संततधार सुरू असलेल्या या पावसादरम्यान जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडली नाही. मात्र शहरी भागातील गटारांच्या सफाई अभावी भिवंडीसह, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर आदी भागात सांडपाणी मोठ्याप्रमाणात तुंबल्यामुळे नागरिकांत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या पावसामुळे दुपारच्या सत्रातील महाविद्यालये, शाळांचेही वेळापत्रक पार कोलमडले होते.
ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यात ६०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. परंतु प्राप्त अहवालानुसार केवळ ५१२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. ठाणे शहरात लुईसवाडी येथे झाडे वाकले असून पारसीक नगरजवळ एक झाड उन्मळून पडले आहे. काही ठिकाणी पाणी साचले.
ठाणे शहारात सर्वाधिक ६८ मिमी पाऊस झाल्याची नोंद असून त्याखालोखाल भिवंडी, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ आदी तालुक्यांसह ठाणे जिल्ह्यात ३९५.८१ मिमी पाऊस पडला आहे.
पालघर जिल्ह्यात तलासरी ६२.६५ मिमी, डहाणू ३९०.२० मिमी सर्वाधिक पाऊस या तालुक्यांमध्ये झाल्याची नोंद आहे.
या खालोखाल जव्हार, वसई, विक्रमगड, मोखाडा, वाडा, पालघर या तालुक्यांमध्ये कमी अधिक पाऊस पडलेला असून पालघर जिल्ह्यात ११७.५७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
गटारे साफ करणाऱ्या ठेकेदारांची कुचराई
पावसाळ्या पूर्वी भिवंडी शहरातील नालेसफाई व गटारे सफाईचा ठेका दिल्यानंतर ठेकेदाराने काम केल्याची खात्री आरोग्य विभागाच्या उपायुक्ता डॉ.विजया कंठे यांनी न केल्याने रस्त्यावर वहाणाऱ्या सांडपाण्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्याचबरोबर मनपाचे रस्ते खराब होत आहेत. पावसाळ्यापुर्वी नाले सफाई व गटारे सफाई करण्याच्या ठेक्यासाठी नगरसेवक व त्यांच्या हस्तकांमध्ये अहमहमिका लागते. मात्र कामामध्ये सर्व ठेकेदारांची पिछेहाट होते.
पूर आला नाही किंवा पाणी साचले नाही हे ठोबळ गणित अधिकारीवर्ग वातानुकूलीत कार्यालयात बसून मांडतात.मात्र प्रत्येक नाल्याची व गटाराची पहाणी करण्यास त्यांना वेळ नसतो.नाल्यांबरोबर गटारे सफाईस दिड महिना झाला.थोडा जास्त पाऊस झाला तरी गटारे तुंबून पाणी रस्त्यावर येते.
पाऊस सुरू असताना शहरांतील अनेक भागात गटाराबरोबर ड्रेनेज तुंबून त्याचे पाणी रस्त्यावरून वहात होते.दोन दिवस पावसाने उसंत घेतली तरीही तुंबलेल्या गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे.त्याचबरोबर परिसरांत दुर्गंधी पसरली आहे.
संततधार पावसामुळे भातपिकास जीवनदान, उत्पन्न वाढण्याची शक्यता
संततधार पावसामुळे भातपिकास जीवनदान मिळाले असून यावर्षी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अनिश्चिततेच्या वातावरणातच तालुक्यात भात लागवड उरकण्यात आली. ५ हजार ६९२ हेक्टर शेती क्षेत्रासाठी कल्याण पंचायत कृषी विभागाने ५० टक्के अनुदानाचे १९७ क्विंटल आणि १०० टक्के अनुुदानावर ११.५० क्विंटल बियाणे वाटप केल.
सांबा हसुरी, श्रीराम कर्जत ३, एमटीयू, जया, आदी जातीचे बियाणे वाटप करण्यात आले. पावसाच्या चांगल्या मध्यंतरामुळे रोपांची उगवण चांगली झाली. परंतु आॅगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. मात्र पडणाऱ्या पावसामुळे भात पिकांना जीवनदान मिळाले आहे.
कृषी विभाने ६.९०० टन युरिया व ४.६०० टन सुफला खतांचेही वाटप केल्याने पीक चांगले येईल असे कृषी अधिकारी गायकवाड यांनी सांगितले. या संततधार पावसामुळे वन विभागात व कल्याण पंचायत समिती आगारात पाणी भरले होते त्यामुळे काही काळ येथे गैरसाये निर्माण झाली होती.