शनिवार-रविवारचा पाणीबंद मागे?

By admin | Published: February 11, 2016 02:46 AM2016-02-11T02:46:30+5:302016-02-11T02:46:30+5:30

शनिवार, रविवारी पाणी बंद ठेवल्यानंतर आणि सोमवारी कमी दाबाने पाणी दिल्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक न पडल्याने शनिवार-रविवारची कपात मागे घेऊन पाणीकपातीचे

Saturday-Sunday waterfowl? | शनिवार-रविवारचा पाणीबंद मागे?

शनिवार-रविवारचा पाणीबंद मागे?

Next

डोंबिवली : शनिवार, रविवारी पाणी बंद ठेवल्यानंतर आणि सोमवारी कमी दाबाने पाणी दिल्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक न पडल्याने शनिवार-रविवारची कपात मागे घेऊन पाणीकपातीचे जुनेच वेळापत्रक पुन्हा लागू केले जाण्याची चिन्हे बुधवारच्या लघू पाटबंधारे, स्टेम, एमआयडीसीसह विविध पालिकांच्या स्टेम बैठकीनंतर दिसू लागली आहेत. दरम्यान, या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे.
उल्हास नदीपात्रातून पाणी उचलण्याच्या वाराचे एकत्रीकरण करून शनिवारी-रविवारी पाणी बंद ठेवल्यानंतरही मीरा भाईंदर पालिकेने सरकारी निर्णयाचा आधार घेत पाणीकपात परस्पर मागे घेतल्याने आणि स्टेमनेही बेसुमार उपसा सुरू ठेवल्याने कल्याण-डोंबिवलीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र सलग दोन दिवस पाणी बंद ठेवून फारसा फरक पडणार नसेल तर पूर्वीचेच वेळापत्रक पुन्हा लागू करा, अशी मागणी कल्याण-डोंबिवलीसह विविध पालिकांनी लावून धरली आहे.
उल्हास नदीच्या पाणीच्या पातळीत झपाट्याने घट होत असून त्यावर उपाय सुचवण्यासाठी लघू पाटबंधारे, एमआयडीसी आणि कल्याण-डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक निष्फळ ठरल्याने पाण्यावरून महापालिकांत युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेने पाणीप्रश्नावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शनिवारी, रविवारी पाणी बंद, सोमवारी कमी दाबाने पाणी आणि मंगळवारी, बुधवारीही पाण्याचा ठणठणाट असल्याने कल्याण-डोंबिवलीतील लोकप्रतिनिधींना टंचाईचा सामना करावा लागला.
नदीच्या पाण्याची पातळी कमी होत ती उणे १३० सेंटीमीटरने खाली आल्याने पालिका अडचणीत आली आहे. जास्तीचा पाणीउपसा करणाऱ्या यंत्रणांविरोधात लघू पाटबंधारे खाते कारवाई करत नाही. मीरा-भाईंदर पालिका पाणीकपात लागू करीत नाही. शनिवार-रविवारचा पाणी बंद पाळत नाही, असा ठपका कल्याण-डोेंंबिवली पालिकेने ठेवला. त्याची गंभीर दखल शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली. त्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह एमआयडीसी, लघू पाटबंधारे यांच्यासोबत डोंबिवलीतील एमआयडीसीच्या कार्यालयात सायंकाळी बैठक घेतली. सर्वच पालिकांना पाणी कपात लागू करा, त्यानंतरही जादा पाणी उचलणाऱ्यांवर काय कारवाई करणार ते स्पष्ट करा, अन्यथा कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांसह शिवसेना पाण्यासाठी आंदोलन करेल, असा इशारा शिंदे, देवळेकर यांनी दिला.

Web Title: Saturday-Sunday waterfowl?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.