सातबारा झाला आॅनलाइन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 02:34 AM2018-05-02T02:34:44+5:302018-05-02T02:34:44+5:30
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील एक हजार ९५३ गावांतील शेतकऱ्यांना आॅनलाइन डिजिटल सातबारा देण्याचे काम सुरु झाले
सुरेश लोखंडे
ठाणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील एक हजार ९५३ गावांतील शेतकऱ्यांना आॅनलाइन डिजिटल सातबारा देण्याचे काम सुरु झाले आहे. या गावांपैकी अंबरनाथ तालुक्यातील बांदणवाडीतील शेतकºयांचे १०० टक्के डिजिटल सातबारा आॅनलाइन झाला असून त्यांच्या वितरणाचा प्रारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १ मे रोजी करण्यात आले.
जिल्हाभरात सुमारे एक लाख ७० हजार ६५६ खातेदार शेतकरी आहेत. यामध्ये एक हेक्टरपर्यंतच्या अत्यल्प भूधारक शेतकºयांपासून ते दोन हेक्टरपर्यंतचे अल्पभूधारक, चार हेक्टरपर्यंतचे लघु, मध्यम, मध्यम भूधारक १० हेक्टरपर्यंत आणि मोठे शेतकरी १० हेक्टरपेक्षा जास्त शेती असलेल्या शेतकºयांचा जिल्ह्यात समावेश आहे. जिल्हाभरातील एक हजार ९५३ गावांमधील शेतजमिनींचे सातबारा आॅनलाइन डिजिटल करण्याचे काम काही महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. सद्य:स्थितीला १०० टक्के डिजिटल सातबारा अंबरनाथच्या बांदणवाडी या महसुली गावातील शेतजमिनीचे तयार झाल्याची माहिती या योजनेचे काम हाताळणारे उपजिल्हाधिकारी जलसिंग वळवी यांनी ‘लोकमत’ला दिली. या आॅनलाइन डिजिटल मोडच्या दृष्टीने एक हजार ९५३ महसुली गावांपैकी आतापर्यंत ८९८ गावांतील शेतजमिनीच्या डिजिटल सातबाºयांसाठी घोषणा प्रपत्र-३ पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित एक हजार ५५ गावांचे काम अर्धवट असल्याच्या वृत्तास वळवी यांनी दुजोरा दिला आहे. या योजनेच्या सातबारा वितरणास शुभारंभ झाला असला, तरी १०० टक्के काम पूर्ण होण्यास आणखी कालावधी लागणार आहे.