सोमवारी ठाण्यात निघणार 'सत्यशोधक दिंडी'

By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 23, 2023 05:38 PM2023-11-23T17:38:04+5:302023-11-23T17:38:36+5:30

महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तमराव पाटील आणि अब्दुल कादर मुकादम या दोन ज्येष्ठ सत्यशोधकांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. 

Satya Shodhak Dindi in Thane on Monday | सोमवारी ठाण्यात निघणार 'सत्यशोधक दिंडी'

सोमवारी ठाण्यात निघणार 'सत्यशोधक दिंडी'

ठाणे : महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या सत्यशोधक समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी सोमवार, २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वा. ठाणे शहरात सत्यशोधक दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार , जगदीश खैरालिया, अभय कांता यांनी दिली. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस २०२३ मध्ये १५० वर्षे पूर्ण होत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिन आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला सत्यशोधक दिंडी काढण्यात येणार आहे. 

या समितीच्या वतीने भगवती मैदान (विष्णूनगर, नौपाडा) ते कॉ. गोदुताई परुळेकर उद्यान (गणेशवाडी, ठाणे महानगरपालिकेजवळ)पर्यंत दिंडीचं आणि समारोपाच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेत्या कॉ. मुक्ता मनोहर आणि सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष के. इ. हरिदास हे प्रमुख पाहुणे  तर महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तमराव पाटील आणि अब्दुल कादर मुकादम या दोन ज्येष्ठ सत्यशोधकांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. 

सत्यशोधक दिंडीच्या या आगळ्या उपक्रमाला ठाण्यातील विविध राजकीय पक्षांनी कृतीशील पाठिंबा दर्शविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना (उबाठा) , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष, रिपब्लिकन पक्ष (ऐक्यवादी) , स्वराज इंडिया आणि आम आदमी पार्टी या पक्षांनी सक्रीय पाठिंबा जाहीर करून या दिंडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 

या दिंडीमध्ये महात्मा फुले यांचा विचार मानणाऱ्या ठाणे शहर व जिल्ह्यांतील सर्व व्यक्ती, संस्था आणि संघटनांनी सक्रिय सहभाग नोदवावा, असं आवाहन सत्यशोधक विचार संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस निर्मला पवार, संजय भालेराव आदी उपस्थित होते.

Web Title: Satya Shodhak Dindi in Thane on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे