सौरभ साहूला दिल्लीतून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 06:06 AM2018-06-19T06:06:38+5:302018-06-19T06:06:38+5:30
बेकायदेशीर सीडीआर प्रकरणातील प्रमुख आरोपी सौरभ साहू याला ठाणे पोलिसांनी अखेर रविवारी दिल्लीतून अटक केली.
ठाणे : बेकायदेशीर सीडीआर प्रकरणातील प्रमुख आरोपी सौरभ साहू याला ठाणे पोलिसांनी अखेर रविवारी दिल्लीतून अटक केली. मोबाइल फोनचे सीडीआर बेकायदेशीरपणे काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने जानेवारी २०१८ मध्ये केला होता. या प्रकरणामध्ये देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह १६ आरोपींना आतापर्यंत अटक केली. आरोपींमध्ये ११ खासगी गुप्तहेरांसह यवतमाळ येथील एका पोलीस शिपायाचाही समावेश आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे नाव आल्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत होते. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या बहुतांश आरोपींना दिल्लीच्या सौरभ साहूने बेकायदेशीररीत्या सीडीआर पुरवल्याचा आरोप आहे. आरोपींच्या चौकशीतून तशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे सौरभच्या अटकेसाठी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू होते. त्याच्या अटकेसाठी आतापर्यंत चारवेळा ठाणे पोलिसांचे पथक दिल्लीला जाऊन आले. त्याच्या नातलगांकडेही चौकशी केली. मात्र, पोलिसांच्या पदरी निराशा आली. Þ
केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यासह काही बडे नेते आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे सीडीआर काढल्याचा आरोप असलेल्या दिल्लीच्या पंकज तिवारीलाला पोलिसांनी मे महिन्यात अटक केल्यानंतर सौरभच्या अटकेची शक्यता वाढली होती. त्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचे पथक दोन दिवसांपूर्वी दिल्लीला रवाना झाले होते. तो गाझियाबादच्या घरी असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी रात्री पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. त्याला २०१६ मध्ये दिल्ली पोलिसांनी, तर २०१७ मध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली. सोमवारी ठाणे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
>महत्त्वाची उकल
सौरभ साहूच्या अटकेने सीडीआर प्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्यांची उकल करणे पोलिसांना शक्य होईल. सौरभ फरार असल्याने पोलिसांचा तपास पुढे सरकत नव्हता. त्याला अटक झाल्याने तो मोबाइल कंपन्यांकडून सीडीआर कसा मिळवायचा, कोणकोणत्या पोलीस अधिकाºयांच्या ई-मेलचा त्याने वापर केला, त्याचे साथीदार कोणकोण आहेत, अशा असंख्य प्रश्नांचा उलगडा पोलिसांना करता येणार आहे.
मोठ्या प्रमाणात सीडीआरची विक्री
वेगवेगळ्या शहरांमधील गुप्तहेर सौरभच्या संपर्कात होते. त्यांच्याशी सीडीआर विक्रीचा सौदा तो अक्षरश: घाऊक भावात करायचा. कुणालाही जास्त प्रमाणात सीडीआर हवे असतील, तर तो एकाचवेळी पुरवायचा. त्यामुळे सीडीआर मिळवण्यासाठी सौरभने तयार केलेल्या साखळीत नेमके कोणकोण आहे, हे पोलीस आता तपासून पाहणार आहेत.