सावरकर आमच्या आदरस्थानी एकनाथ शिंदेंनी केली भूमीका स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 10:34 PM2019-12-15T22:34:20+5:302019-12-15T22:41:15+5:30
पोलिसांच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये आरक्षणाची टक्केवारी वाढविण्यासाठीविचार करु, तसेच पोलिसांच्या कामाचे तास कमी कसे करता येतील आणि त्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्याचीही ग्वाही राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: स्वातंत्र्यवीर सावरकर हे राज्याचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. त्याविषयी शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे, असे परखड मत राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी व्यक्त केले. पोलिसांच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये आरक्षणाची टक्केवारी वाढविण्यासाठीविचार करु, तसेच पोलिसांच्या कामाचे तास कमी कसे करता येतील आणि त्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्याचीही ग्वाही शिंदे यांनी दिली.
काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने भाजप सरकारने गदारोळ केला होता. त्याला उत्तर देताना गृहमंत्री शिंदे यांनी वरील वक्तव्य केले. ठाण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील पोलीस कर्मचारी वास्तव्यास असलेल्या जरीमरी पोलीस वसाहतीला शिंदे यांनी रविवारी दुपारी भेट दिली. गृहमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा होता. पोलीस वसाहती आणि पोलीस कर्मचारी यांचे राहणीमान सुधारावे, यासाठी अनेक मोठी पाऊले उचलणार असल्याचीही त्यांनी यावेळी ग्वाही दिली. सुमारे १०२ वर्षांच्या ब्रिटीशकालीन पोलीस वसाहतीसह १९९२ चे बांधकाम असलेल्या तळ अधिक तीन मजली आणि २०११ चे बांधकाम असलेल्या नविन पोलीस वसाहतींचीही त्यांनी यावेळी पाहणी केली. सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार तसेच १०० ते १५० पोलीस कुटंूबीय यावेळी उपस्थित होते. अनेकांनी यावेळी वसाहती जुन्या असल्यामुळे त्यांच्या डागडुजीची गरज असल्याचे गाºहाणे मांडले. उंदीर घुशींचा प्रादुर्भाव, ड्रेनेजच्या टाक्यांची अस्वच्छता आणि मेन्टनस वेळेत न होणे आदी समस्यांचा पाढाच गृहमंत्र्यांपुढे वाचला. तर काही महिलांनी पोलीस भरतीमध्ये मुलांना सध्याचे पाच टक्क्यांचे आरक्षण वाढवून देण्याची मागणी केली. त्यावर सर्व पोलीस वसाहतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून गरज पडल्यास तातडीने डागडुजी करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि नोकरीचा प्रश्नही प्राधान्य तत्वावर सोडविण्याचा प्रयत्न करणार असून त्यांच्या कामाचे तासही कमी कसे होतील, हे पाहण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलीस बांधव उन पावसाची तमा न बाळगता अविरत सेवा देतात त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पावसात अनेक इमारतींच्या प्रसाधनगृहांची दुरवस्था झालेली असते त्यावर तातडीने उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सूतोवाच केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. शिंदे यांनी अनेक घरांमध्ये वैयक्तिकरित्या जाऊन पोलीस कुटूंबियांशी संवाद साधल्याने या पोलीस कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले.