‘गडकरी’च्या आवारात सावरकरांचा स्मृतिस्तंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:05 AM2019-06-21T00:05:16+5:302019-06-21T00:05:39+5:30
अंदमानच्या स्मृतींना उजाळा; ठाणे महापालिकेचा पुढाकार
ठाणे : स्वा. वि.दा. सावरकर यांची चिरंतन आठवण राहावी व तरुण पिढीसमोर त्यांचा एक आदर्श राहावा, यासाठी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतिस्तंभ उभारण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
हा स्मृतीस्तंभ गडकरी रंगायतनच्या प्रवेशद्वाराजवळील आणि तिकीट खिडकीला लागून असलेल्या कृत्रिम धबधब्याजवळ राहणार आहे. सावरकरांचे ‘ने मजसी ने परत...’ असे सागराला आवाहन करणारे गीत चित्रबद्ध केले आहे. अंदमानच्या कारागृहातील स्वतंत्र भारताचे कृतिशील स्वप्न पाहणारे सावरकर, त्या कालावधीतील त्यांची अस्वस्थता आणि त्यातून निर्माण झालेले काव्य हेच जणू दृश्य स्वरूपात स्मृतिस्तंभाद्वारे मांडण्यात येणार आहे. ६० बाय ६० चौरस फूट जागेत सावरकरांचे संकल्पचित्र साकारून वर अंदमानच्या कालकोठडीचे चित्र व पुढे पाण्यात निखळून पडलेली खिडकीची चौकट, त्यापुढे कोलमडून पडलेला ब्रिटिश सत्तेचा पिंजरा व त्यातून बाहेर पडणारे स्वातंत्र्यप्रेमी पक्षी म्हणजे स्वांतत्र्यासाठी तळमळणारे भारतीय, अशा प्रकारची कल्पना साकारण्यात येणार आहे. या स्मृतिस्तंभाची संकल्पना ठामपा सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी मांडली असून त्याची निर्मिती जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधील सुनील चौधरी करत आहेत.
स्वा. सावरकर हे थोर नाटककारही होते. त्यामुळे गडकरी रंगायतनच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या स्मृतिस्तंभाला विशेष महत्त्व आहे. हा स्मृतिस्तंभ ठाण्यातील जनतेसाठी अखंड प्रेरणास्रोत ठरणार असून महिनाभरात त्याचे काम पूर्ण होणार आहे, अशी माहिती म्हस्के यांनी दिली आहे.