रद्दीत जाणाऱ्या पुस्तकांचे जतन; दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 12:15 AM2020-01-01T00:15:27+5:302020-01-01T00:15:31+5:30

कॉस्मिक इकॉलॉजिकल ट्रस्ट, मैत्री फाउंडेशनचा उपक्रम

Save books to trash; Digitization of rare texts | रद्दीत जाणाऱ्या पुस्तकांचे जतन; दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन

रद्दीत जाणाऱ्या पुस्तकांचे जतन; दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन

googlenewsNext

- जान्हवी मोर्ये 

डोंबिवली : दुर्मिळ ग्रंथसंपदा हे ज्ञानाचे भंडार आता अडगळीत पडू लागले आहे. त्यांचे महत्त्व माहीत नसल्याने ते घरात अडगळ ठरू लागते आणि हा अमूल्य ठेवा रद्दीची भर ठरतो. हा ठेवा जतन करण्यासाठी कॉस्मिक इकॉलॉजिकल ट्रस्ट आणि मैत्री फाउंडेशन यांनी पुढाकार घेऊ न या पुस्तकांचे डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पुस्तके संस्थेच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येणार आहे.

पूर्वीच्या काळात ग्रंथ हे ज्ञानाच्या आदानप्रदानाचे साधन होते. एका पिढीकडून दुसºया पिढीकडे ज्ञान संक्रमित व्हावे, यासाठी पुस्तकांचे लिखाण केले जात होते. त्यामुळे हे ज्ञान जतन करण्यासाठी नागरिकांना रद्दीतील व घरातील पुस्तके देण्याचे आवाहन केले आहे. ही सर्व पुस्तके संस्था स्वखर्चाने डोंबिवलीत आणणार आहेत. नागरिकांनी केवळ पुस्तके असल्याची माहिती संस्थेला द्यायची आहे. या पुस्तकांतून दुर्मिळ ग्रंथ वेगळे करून इतर पुस्तके आदिवासीपाडे, अनाथाश्रम, गावखेड्यांतील वाचनालयांना भेट देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या चळवळीला हातभार लावावा, असे आवाहन ‘कॉस्मिक इकॉलॉजिकल’चे डॉ. उदयकुमार पाध्ये यांनी केले आहे.

आतापर्यंत एक हजारांच्या आसपास पुस्तके जमा झाली आहेत. यामध्ये दादर, भार्इंदर, मुंबई, अंधेरी, विक्रोळी अशा विविध भागांतून प्रतिसाद मिळत आहे. ही सर्व पुस्तके प्रवीण गावडे यांच्या फडके रोडवरील घरात ठेवण्यात येणार आहेत. गावडे हे रेल्वेत नोकरी करत असून या सामाजिक कार्याला त्यांनी आपली जागा मोफत दिली आहे. शासनसुद्धा ग्रंथालयांच्या मदतीने दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटलायझेशन करत आहे. त्यांनी त्यांचे काम करावे. आम्ही आम्हाला जी पुस्तके उपलब्ध होतील, त्यांचे डिजिटलायझेशन करणार असल्याचे ‘मैत्री’च्या अध्यक्षा सृष्टी गुजराथी यांनी सांगितले. तसेच फोर्ट येथे जाऊन जुनी पुस्तके विकत घेण्याचीही संस्थेची तयारी आहे, अशी माहिती सुधीर इनामदार यांनी दिली. या कामात डॉ. अशोक जैन, डॉ. एस. के. वर्मा यांचे सहकार्य मिळाले आहे.

अनेक ग्रंथ झाले जमा
संस्थेला १८४४ चे ‘त्रैलोक्य प्रकाश’ हे पुस्तक उपलब्ध झाले आहे. लाहोरच्या एका कुशल अ‍ॅस्ट्रोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने एका ऋषीमुनींच्या हस्तलिखितांवरून हे पुस्तक छापले आहे. या पुस्तकांचे लेखक हेमप्रभा सुरी आहेत. डॉ. बनारसी जैन यांनी त्याला प्रस्तावना दिली आहे.
‘चातकशिरोमणी’ हे पुस्तक १९३६ मध्ये दुसरी आवृत्ती आहे. हे पुस्तक आता बाजारात आहे; पण त्यात दोन दुर्मिळ अशा ग्रंथाची माहिती दिली आहे. त्यामध्ये ‘मयूरचित्रक’ हे रायगड येथे हस्तलिखित सापडले, त्यांचा उल्लेख या पुस्तकांत आहे. मयूरचित्रकावरून कोणत्या नक्षत्रांवर पाऊस पडेल. कोणत्या पिकांना फायदा होईल हे दिले आहे. ‘शतमंजिरी राजयोग’ हाही दुर्मिळ भाग यात आढळून येत आहे.
‘कलम करण्याचे शास्त्र’ या पुस्तकात ब्रिटिशकालीन बागकामांची माहिती दिली आहे. ना.म. पटवर्धन यांचे ‘प्रमुख पिके आणि ते पिकविणारे लोक’ हे पुस्तकही उपलब्ध झाले आहे. १९४१ मध्ये या पुस्तकांची दुसरी आवृत्ती निघालीआहे. या पुस्तकात स्वीडन, स्पेन, सौदी अरेबिया, ब्रह्मदेश, डेन्मार्क, कॅनडा येथील पिकांची माहिती आणि पिकवणाऱ्यांची माहिती दिली आहे.
‘वर्ल्ड मॅप’ या पुस्तकात जगाचा नकाशा तसेच सूर्याची उंची मोजण्याची साधने, होकायंत्र यांची माहिती दिली आहे. औषधी पुस्तके ही काही उपलब्ध झाली आहेत. त्या पुस्तकात मोडी लिपीचा उल्लेख आढळून येत आहे. मा. का. देशपांडे यांचा इंग्रजी सुवचनांचा कोष, नर्सिंगवरील पुस्तक, १९४० मधील संगीत शास्त्रावरील पुस्तक, जलचिकित्सा यावरील पुस्तके उपलब्ध आहेत.

Web Title: Save books to trash; Digitization of rare texts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.