सावित्रीबाई फुले कलामंदिरातील बेसमेंट सिमेंट, विटांनी ‘पॅक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 01:42 AM2019-05-02T01:42:32+5:302019-05-02T01:43:02+5:30
प्रवेशद्वाराला ठोकले टाळे, कडेकोट बंदोबस्त
डोंबिवली : पूर्वेतील सावित्रीबाई फुले कलामंदिरातील बेसमेंटमध्ये विधानसभानिहाय मतदानयंत्रे ठेवली आहेत. हे बेसमेंट पूर्णपणे सिमेंट, विटा लावून बंद केले आहे. तर, एकमेव प्रवेशद्वारही मोठे कुलूप लावून तेही बंद केले आहे.
बेसमेंटच्या चारही बाजूंना कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. बेसमेंटच्या मुख्य भागात केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या केंद्रीय राखीव दलाचे पोलीस (सीआरपीएफ) तैनात करण्यात आले आहेत. चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. इतकेच नव्हे तर ज्या स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवल्या आहेत, तिथे आयोगाच्या निर्देशांनुसार कुठल्याही प्रकारची वायरिंग नाही. म्हणजे, हे बेसमेंट अंधारात राहणार आहे. आतमध्ये लाइटही लावलेले नाही.
बेसमेंटमध्ये विधानसभानिहाय तयार केलेल्या खोल्यांना तिजोरीसारखे दरवाजे लावण्यात आले आहेत. २३ मे रोजी क्रीडासंकुलातील बंदिस्त क्रीडागृहात मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत या स्ट्राँगरूममध्ये कडेकोट बंदोबस्तात मतदानयंत्रे व व्हीव्हीपॅट मशीन ठेवण्यात येणार आहेत.
कोणाला घेता येणार सुरक्षेचा आढावा?
फुले कलामंदिरातील ज्या स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत, त्या परिसरात कुणालाही जाण्याची परवानगी नाही.
परंतु, लोकसभा निवडणुकीतील उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना ईव्हीएम सुरक्षित आहेत किंवा नाही, याचा आढावा घ्यायचा असेल, तर त्यांना ते पाहता येऊ शकेल. मात्र, त्यासाठी रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी येथे एक लॉगबुकही ठेवलेले आहे.
अधिकारी स्वत: हजर
फुले कलामंदिरातील बेसमेंटमध्ये स्ट्राँगरूमची व्यवस्था आहे. सर्व कंटेनर आल्यावर त्यातील ईव्हीएम काढून ते स्ट्राँगरूममध्ये बुथनिहाय लावून घेण्यात आले. ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालली. यावेळी कल्याण लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादबाने हे स्वत: हजर होते. यासोबतच सर्व विधानसभांचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या देखरेखीखाली सर्व ईव्हीएम व्यवस्थित ठेवून स्ट्राँगरूमची सुरक्षा सीआरपीएफच्या ताब्यात दिली.