सावित्रीबाई फुले कलामंदिरचे उत्पन्न वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:30 AM2017-07-28T00:30:05+5:302017-07-28T00:30:21+5:30
शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या सावित्रीबाई फुले कलामंदिरच्या उत्पन्नात ६० टक्के वाढ झाली आहे. या कलामंदिरात होणारे विविध सांस्कृतिक, सांगीतिक कार्यक्रम, नाटकांचे प्रयोग यांना रसिक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे
जान्हवी मोर्र्ये ।
डोंबिवली : शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या सावित्रीबाई फुले कलामंदिरच्या उत्पन्नात ६० टक्के वाढ झाली आहे. या कलामंदिरात होणारे विविध सांस्कृतिक, सांगीतिक कार्यक्रम, नाटकांचे प्रयोग यांना रसिक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे उत्पन्नाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता कलामंदिरचे व्यवस्थापक दत्तात्रेय लधवा यांनी व्यक्त केली आहे.
लधवा पुढे म्हणाले की, कलामंदिरची दीड वर्षात डागडुजी झालेली नाही. मात्र, उत्पन्नात यंदाच्या वर्षभरात वाढ झाली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अतिथी कक्षातील सोफा तसेच लहानसहान दुरुस्त्या केल्या होत्या. अभिवाचन, राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणाºया कलाकारांना तालीम करण्यासाठी नाट्यगृहातील जागा मोफत उपलब्ध करून दिली जाते. कलामंदिरचे उत्पन्न वाढवण्यासाठी शूटिंगचे कार्यक्रम वाढवले. तसेच स्थानिक कलाकारांना भेटून त्यांना नाट्यगृहात कार्यक्रम करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
या कलामंदिरात महिन्याला ३० ते ४० कार्यक्रम होतात. शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या काळात हा आकडा ५० ते ६० वर जातो. शाळांसाठी १० हजार रुपये भाडे आकारले जाते. कॉन्फरन्स हॉलसाठी साडेपाच हजार रुपये भाडे आहे.
अनेकांना येथे कॉन्फरन्स हॉल असल्याची माहितीही नव्हती. त्यामुळे त्यातून उत्पन्न मिळत नव्हते. पण, आता कॉन्फरन्स हॉलमध्येही महिन्याला १० कार्यक्रम होतात. डिसेंबरमध्ये प्रतिसवाई एकांकिका स्पर्धा घेण्यात येणार आहे, असे लधवा यांनी पुढे सांगितले.
पर्यावरणाची जोड
सावित्रीबाई फुले कलामंदिरच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त पर्यावरण दक्षता मंचतर्फे घनकचरा व्यवस्थापन, या विषयावर कलादालनात प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. हे प्रदर्शन दोन दिवस नागरिकांना पाहता येईल. सामाजिक बांधीलकीतून ऊर्जा फाउंडेशनतर्फे प्लास्टिक जमा करणार आहे. नागरिकांनी घरातील प्लास्टिक येथे आणून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बसची मागणी
सावित्रीबाई कलामंदिरकडून केडीएमटी बसचा मार्ग असावा, अशी मागणी कलाकारांच्या शिष्टमंडळाने नुकतीच महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे केली. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी याबाबत आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले आहे.
सावित्रीबाई कलामंदिरचा दहावा वर्धापन दिन शुक्रवार, २८ जुलैला साजरा होत आहे. विविध क्षेत्रांतील कलाकार एकत्र येऊन हा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. या कार्यक्रमासाठी महापालिकेकडून कोणताच निधी घेतलेला नाही. मागील वर्षीपासून नाट्यगृहाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी सर्व कलाकार एकत्रित येत आहे. आपली कला ते नटराजाच्या चरणी अर्पण करतात. शुक्रवारी सकाळी ९ वाजता नटराजाचे पूजन व त्यानंतर गणेशवंदना सादर केली जाईल. डोंबिवलीतील दोनतीन शाळांतील बॅण्डपथक या वेळी उपस्थित असतील.सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता सादर केले जाणार आहेत. त्यात कलाकार कथ्थक, कुचीपुडी, फोक डान्स, पारंपरिक नृत्य, गायन, नाट्य, स्कीट असे विविध १५ ते १६ प्रकार सादर करतील. वर्धापनदिनाच्या निमित्ताने १५० ते २०० कलाकार एकत्र येणार आहे.या कार्यक्रमांसाठी मध्यवर्ती स्वच्छता समितीचे सदस्य अमरेंद्र पटवर्धन, दीपाली काळे, भाग्यलक्ष्मी पडसलगीकर, सुनीला पोतदार, सायली शिंदे, अमोल ओक यांनी महापौर राजेंद्र देवळेकर व केडीएमसीतील सर्व पदाधिकाºयांना आमंत्रित केले आहे.