सावित्रीबाई फुले कलामंदिर : ‘रखडनाट्य’ संपता संपेना!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 03:48 AM2018-12-24T03:48:27+5:302018-12-24T03:48:53+5:30
वातानुकूलित यंत्रणा बदलण्यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून येथील सावित्रीबाई फुले कलामंदिर बंद ठेवण्यात आले आहे.
डोंबिवली : वातानुकूलित यंत्रणा बदलण्यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून येथील सावित्रीबाई फुले कलामंदिर बंद ठेवण्यात आले आहे. साडेतीन महिने उलटूनही हे काम अद्याप सुरू झालेले नाही. या रखडनाट्याला प्रशासनाबरोबरच राजकीय अनास्थाही कारणीभूत असल्याची चर्चा आहे. कामाला होत असलेल्या विलंबाबाबत कलाकारांमध्ये नाराजी असून ही सांस्कृतिक उपासमार कधी थांबणार, असा सवालही रसिक करत आहेत.
एप्रिल २०१७ मध्ये कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिर देखभाल-दुरुस्तीसाठी बंद केले होते. मात्र, वर्ष उलटूनही काम सुरू झाले नव्हते. अखेर, दीड वर्षाने काम पूर्ण होऊ न या नाट्यगृहाचा पडदा १ आॅक्टोबर २०१८ ला उघडला होता. हीच अनास्था डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिराबाबत दिसत असून नियोजनाचा अभावच याला कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे. सावित्रीबाई फुले कलामंदिर हे नाट्यगृह एमआयडीसी भागात आहे. याठिकाणी रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणाचा फटका नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणेला बसत असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर कल्याणच्या अत्रे रंगमंदिराच्या धर्तीवर येथे चिलर वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात येणार आहे. गणेशोत्सवात नाट्यप्रयोग बंद असतात. त्यामुळे या कामासाठी फुले कलामंदिर ८ सप्टेंबरपासून बंद ठेवण्यात आले आहे. पण, आता नाताळ आला तरी या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. नाट्यगृह बंद करताना तीन महिन्यांत वातानुकूलित यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला होता. साडेतीन महिने उलटूनही प्रत्यक्षात काम सुरू झालेले नसल्याने प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. त्याचबरोबर कलाकार आणि रसिकांचाही अपेक्षाभंग झाला आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रियाही पार पडून या कामाला स्थायी समितीची मान्यताही मिळाली आहे. मग घोडे अडले कुठे, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला साजरा करण्यात आला. त्यावेळी कलाकारांनी नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती उपस्थित असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांकडे केली होती. लवकरच कंत्राटदाराला कार्यादेश दिले जातील आणि कामाला प्रारंभ केला जाईल, असे त्यावेळी सांगण्यात आले, पण अद्यापपर्यंत ठोस कार्यवाही न झाल्याने डोंबिवलीकरांची सांस्कृतिक उपासमार कायम राहिली आहे. महापौर विनीता राणे आणि ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी दुरुस्तीसाठी बंद असलेले आचार्य अत्रे रंगमंदिर लवकर सुरू व्हावे, म्हणून विशेष पुढाकार घेतला होता. पण, डोंबिवलीतील नाट्यगृहाच्या कामाबाबतही त्यांनी पुढाकार घ्यावा आणि नाट्यगृह चालू करावे, अशी मागणी नाट्यरसिक करत आहेत.
काम लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न : कामाला विलंब होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण, कामांचा दर्जा उत्तम राखणे, तसेच नियमानुसार काम होणेही अपेक्षित असते. अत्रे रंगमंदिराप्रमाणे सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे कामही लवकरच पूर्ण करण्यावर आमचा विशेष भर असल्याचे महापौर विनीता राणे यांनी सांगितले.
उद्देशालाच फासला हरताळ
डोंबिवली शहराची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख आहे. मात्र, या नगरीतच सांस्कृतिक उपासमार सुरू आहे. देखभाल दुरुस्ती महत्त्वाची आहे, पण अशा प्रकारे काम सुरू व्हायला विलंब लागत असल्यास ते बरोबर नाही. नाट्यगृहे अशा प्रकारे दुरुस्तीच्या नावाखाली कोणतेही काम सुरू न करता महिनोन्महिने बंद ठेवून मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. याला सर्वस्वी प्रशासनाबरोबर सत्ताधाºयांचीही उदासीनता कारणीभूत असल्याचे केडीएमसीचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी सांगितले.
दोन दिवसांत कामाला प्रारंभ : काम सुरू करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कामाला प्रारंभ केला जाणार आहे. दोन ते तीन दिवसांत कामाला सुरुवात होईल, असा दावा केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.