कर्जासाठी कागदपत्रे घेत घोटाळा, १६ हजार कोटींवर झाले व्यवहार
By जितेंद्र कालेकर | Published: October 10, 2023 12:29 AM2023-10-10T00:29:10+5:302023-10-10T00:29:43+5:30
एका बँक खात्यात ३४५ कोटींची उलाढाल, ठाणे पोलिसांकडून आरोपींचा शोध
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गरीब, गरजू लोकांना कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली केवायसीची कागदपत्रे घेतल्यानंतर त्याच कागदपत्रांच्या आधारावर ९७ नोटराईस भागीदारी संस्था तसेच यासारख्या अनेक बनावट संस्था स्थापन करण्यात आल्या. याच संस्थांमार्फत २६० बँक खात्यांवर १६ हजार कोटींपेक्षा जास्त व्यवहार झाले. यातील बहुतांश रक्कम परदेशातही पाठविण्यात आली. यासाठी बँकेच्याच माजी अधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांना मदत केली असून, या संपूर्ण टोळीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी सोमवारी दिली.
पेमेंट गेटवे तसेच पेआऊट सुविधा पुरविणाऱ्या पेगेट इंडिया कंपनीच्या संगणक कार्यप्रणालीत बेकायदा प्रवेश करून कंपनीच्या बँक खात्यातून २५ कोटी १८ हजारांची रक्कम विविध खातेधारकांना वळती केली होती. हे लक्षात आल्यानंतर पेगेट इंडिया या कंपनीने ठाणे सायबर सेलमार्फत माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत श्रीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्याच्या तपासात २५ कोटींपैकी एक कोटी ३९ लाख १९ हजार २६४ रुपये हे रियाल एंटरप्रायजेसच्या नावे असलेल्या एचडीएफसी बँकेत वळते झाल्याचे आढळले. रियालच्या वाशी, बेलापूरमधील कार्यालयातील तपासणीत या २६० बँक खात्यांची आणि त्याद्वारे १६ हजार १८० कोटींचे व्यवहार झाल्याची बाब पुढे आली. यातील एक कार्यालय हे ठाण्याच्या नौपाडा भागात असल्याने याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात ६ ऑक्टोबर २०२३ रोजी दुसरा गुन्हा दाखल झाला. रियालच्या कार्यालयातूनच पाच नोटराईस भागीदारी संस्था तसेच यासारख्या अनेक बनावट संस्था स्थापन करून सरकारची फसवणूक केल्याचेही उघड झाले.
बँकामधील माजी कर्मचारी समीर दिघे आणि जितेंद्र पाटील यांनी गरजूंना गाठून कर्ज देण्याच्या नावाखाली त्यांची केवायसीची कागदपत्रे मिळविली. त्यावर नोटरराईज पार्टनरशिप सुरू केली. त्यांची नोंदणीही केली नाही. तरीही बँक खाती सुरू करून त्यावर सर्रास कोट्यवधींचे व्यवहार झाले. ज्या ९७ भागीदारांच्या नावाने हे फर्म सुरू केले त्यांना हा प्रकारच माहीत नाही. याच भागीदारांच्या नावाने २६० बँक खाती सुरूही करण्यात आली. यातल्याच एका खात्यावर तर आरबीएल बँकेमध्ये १४ खात्यांमधून ३४५ कोटींची रक्कमही आली. सध्या यामध्ये संजय सिंग, अमोल आंधळे ऊर्फ अमर, केदार ऊर्फ समीर दिघे अशा पाचजणांविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. या सर्वच आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांनी शासनाच्या आयकर विभाग, जीएसटी विभाग यांचीही फसवणूक केल्याने संबंधित विभागालाही याची माहिती दिल्याचे डॉ. उगले यांनी सांगितले.
केवायसी देताना सावधान...
कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली केवायसीची कागदपत्रे घेऊन हा फसवणुकीचा प्रकार झाल्याने नागरिकांनी कर्जासाठी कागदपत्रे देताना सावधानता बाळगावी, ती त्याच कामासाठी वापरली जात आहे ना? याची खात्री करावी, असे आवाहन ठाणे गुन्हे शाखेच्या सायबर विभागाने केले आहे.