संशयकल्लोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:40 AM2018-03-29T00:40:46+5:302018-03-29T00:40:46+5:30
मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रात येणारे खोटं बोलून गर्भपात करत असतील तर काय करावं? डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा द्यावी की, पोलिसांसारखं पेशंट खरं बोलतात की खोटं
डॉ. स्वाती गाडगीळ
मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रात येणारे खोटं बोलून गर्भपात करत असतील तर काय करावं? डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा द्यावी की, पोलिसांसारखं पेशंट खरं बोलतात की खोटं; हे शोधण्याचं काम करावं? दवाखान्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाकडे संशयी नजरेने पाहावे का? अशाने काम कसं करणार डॉक्टर? आलेल्या रुग्णाचा वयाचा दाखला मागावा की, लग्नाच्या नोंदणीचे पत्र मागावे की, पासपोर्टसाठी मागतात तसे लग्नातले फोटोदेखील मागावे? नक्की करावे तरी काय? या साऱ्या संशयकल्लोळात डॉक्टर आणि पेशंटचं नातं विश्वासार्ह कसं राहील?
ओपीडी संपत आली होती. शेवटचा पेशंट डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला आणि तेवढ्यात एक जोडपं आत आलं. मुलीने जीन्स व टी शर्ट घातला होता. मुलगासुद्धा साधारण तशाच कपड्यात होता. स्वागत कक्षाच्या एका कोपºयात ती मुलगी अंग चोरून बसली. मुलगा जरा बावरलेलाच दिसत होता. दुपारचे जवळजवळ अडीच वाजल्यामुळे डॉक्टर आता नवा पेशंट घेणार नाहीत, असं रिसेप्शनिस्टने सांगितलं. तसा तो गयावया करू लागला. ‘सॉरी, उशीर झाला. आॅफिसमधून अर्ध्या दिवसाची रजा घेऊन आलोय. आम्ही खूप दूर राहतो. प्लीज सांगा ना डॉक्टरांना...’
तिने त्यांचं नाव, पत्ता, फोन नंबर लिहून घेतला व त्यांना आत सोडलं. नवीनच लग्न झालं आहे व प्रेगनन्सी टेस्ट पॉसिटिव्ह आली आहे; पण इतक्यात बाळ नकोय कारण पक्की नोकरी नाहीये; असं सांगितलं. हॉस्पिटल सरकारमान्य गर्भपात केंद्र होतं. डॉक्टरांनी त्यांना अजून काही तपासण्या करून यायला सांगितलं व सगळं नॉर्मल असेल तर गर्भपात करता येईल असं म्हणाले. जमलं तर संध्याकाळीच सगळे रिपोर्ट घेऊन येतो, असं म्हणून ते दोघे बाहेर पडले.
संशय घेण्यासारखं काही वाटलं नाही. त्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र होतं व पायात जोडवीसुद्धा. तिला तपासताना नर्सचं बारीक लक्ष होतं. रात्री तो मुलगा एकटाच आला. ओपीडी संपतानाच. सगळे रिपोर्ट घेताना साहजिकच त्याला उशीर झाला; पण दिवस वाया नको जायला म्हणून त्याचा खटाटोप सुरू होता.
दुसºया दिवशी डॉक्टरांनी तिला उपाशीपोटी आणण्याबद्दल सांगितले. तोही लगेचच घाईघाईने निघाला. ते दोघे ११ वाजता आले. मुलगी उपाशीपोटी आली होती म्हणून अॅडमिशन पेपर केला. सगळी तयारी झाली. दुपारी १ वाजता तिचं क्युरेटिंग झालं आणि रात्री ८ च्या सुमारास डिस्चार्ज मिळाल्यावर दोघे निघून गेले. दोन दिवसांनी फेरतपासणीसाठी बोलावलं होतं; पण ते आले नाहीत. फोन करून फक्त सांगितलं की, तिची तब्येत ठीक आहे. या घटनेला साधारण चार महिने होऊन गेले. अचानक एक दिवस त्या मुलीचे आईबाबा डॉक्टरांना भेटायला म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये आले. तिच्या केलेल्या गर्भपाताबद्दल चौकशी करू लागले. त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास हॉस्पिटलने नकार दिला. ‘अशी कुठल्याही पेशंटची माहिती आम्ही देऊ शकत नाही. तिचे व तुमचे फोटो ओळखपत्र लागतील व तिने रीतसर लेखी अर्ज केल्याशिवाय योग्य ती कागदपत्रे देता येणार नाहीत; पण खरंतर डिस्चार्जकार्ड त्याच दिवशी दिलं होतं. तरीही नक्कल हवी असल्यास, ती सज्ञान असल्यामुळे तिच्याच सहीने देऊ शकतो, सॉरी.’
ते दोघे निघून गेले पण लगेचच दुसºया दिवशी मागितलेली ओळखपत्रं व त्या मुलीलाच बरोबर घेऊन आले. तिने अर्जामध्ये आॅफिसमधून वैद्यकीय बिल मिळण्यासाठी पेपर्स हवे आहेत; असं लिहिलं होतं. पुन्हा फक्त डिस्चार्जकार्डचीच कॉपी देण्यात आली. गर्भपाताचा तपशील केवळ त्या विभागाचे नियुक्त प्राधिकारी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणात मॅजिस्ट्रेटच्या आदेशानुसार कोर्टाकडे सोपवता येतात. या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल आहे, असा संशय डॉक्टरांना आला; पण स्वत: काही चौकशी करण्यापेक्षा त्यांनी तेव्हा गप्प राहणं पसंत केलं.
काहीच दिवसांत मात्र डॉक्टरांना कोर्टाची नोटीस आली की, बलात्कार प्रकरणात गर्भपात झाला आहे आणि त्यासंदर्भातील सगळी कागदपत्रे सादर करावे आणि कोर्टासमोर हजर व्हावे. एकूण प्रकरण डॉक्टरांच्या लक्षात आले. त्या जोडप्याने लग्न झालं असल्याची थाप मारली होती. नंतर मुलीच्या आईवडिलांना ती बाब समजताच बलात्काराची तक्रार नोंदवली गेली आणि डॉक्टर पण या कटकारस्थानात सामील आहे, असं तक्रारीत नोंदवलं गेलं.
जेव्हा की सत्य परिस्थिती ही होती की, ते दोघे नवराबायको म्हणून आले होते आणि फोटो ओळखपत्रदेखील जमा केले होते. दोघांच्यात काही बिनसलं आहे, असा संशय येण्यासारखं काही वाटलं नव्हतं.
हल्ली बरीच जोडपी जीन्स आणि कॅज्युअल्समध्येच असतात. त्यामुळे डॉक्टरांनी त्या दोघांच्या सहीने गर्भपात केला होता. करण्यापूर्वी सगळ्या तपासण्यादेखील केल्या होत्या. कोर्टासमोर न घाबरता सगळी कागदपत्रे सादर करायचे आणि सगळं खरं सांगायचं, असा निश्चय मनोमन करून डॉक्टर घरी निघून गेले.
दुसºया दिवशी वैद्यकीय वर्तुळात एकच चर्चा. ‘अरे, मग त्या गर्भपाताला उपस्थित असलेला भूलतज्ज्ञ कोण होता आणि त्याला पण कोर्टाच्या फेºया मारायला लागणार का?’ यावर तर्कवितर्कसुुरू झाले. खबरदारी म्हणून त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तर सगळ्यात हुशार वकील या केसवर नेमला.
खरेच विवाहित असलेले जोडपे गर्भपात करून गेल्यावर, नवºयाने व सासूसासºयांनी जबरदस्तीने गर्भ पाडून घेतला, असा आरोप करत महिला कोर्टात घटस्फोटाची केस दाखल करते आणि त्यात डॉक्टरदेखील सामील होते, असेसुद्धा सांगायला कमी करत नाही! अशा घटनांचीदेखील नोंद आहे. अशा परिस्थितीत करावे तरी काय डॉक्टरांनी? एकूण काय तर, विश्वासाला तडा गेला की, सगळंच खोटं वाटायला लागतं! दुधाने पोळल्यावर ताकदेखील फुंकून पितो, त्यातली गत होते.
रुग्णांसाठी काही लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या बाबी अशा आहेत की, ज्या रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी व सोनोग्राफी करण्यासाठी जाता, ते ठिकाण नोंदणीकृत आहे ना, याची खात्री करावी. तसे प्रशस्तीपत्र हॉस्पिटलमध्ये बाहेर स्वागत कक्षात लावणे नियमानुसार बंधनकारक आहे. त्याशिवाय, डॉक्टरांचे डिग्री सर्टिफिकेटसुद्धा दर्शनी भागात लावलेले असते, ते तपासून पाहावे. त्यातून डॉक्टरकडे योग्य शाखेची योग्य पदवी आहे ना, हे समजते. हॉस्पिटलनेसुद्धा स्वत:च्या बचावासाठी वयाचा दाखला, अर्थात फोटो ओळखपत्राची प्रत घ्यावी. अगदी सामान्य हॉटेलमध्येसुद्धा रूम हवी असल्यास फोटो आयडी मागतात, मग हॉस्पिटलमध्ये का नको? तिथे तर जीवनमरणाचा खेळ असतो. विवाहबाह्य केसेसमध्ये ‘तो मुलगा त्या मुलीला’ ओटीमध्ये घेतले की, पळून जाण्याचा पण धोका असतो, किंबहुना असे घडलेदेखील आहे. दुर्दैवाने वरीलप्रमाणे एखाद्या डॉक्टरला काहीही चूक नसताना विनाकारण कोर्टाच्या फेºया पडू शकतात. १८ वर्षे पूर्ण झालेली मुलगी स्वत:वर कुठलीही शस्त्रक्रि या करण्यासाठी संमती देऊ शकते व संमतीपत्रावर सह्या करू शकते; मात्र एक ओळखीची जबाबदार व प्रौढ व्यक्ती सोबत असावी, असा संकेत आहे. अन्यथा, जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कळवून मग योग्य ती शस्त्रक्रि या करता येते.
सदैव डोक्यावर टांगती तलवार ठेवून काम करणे सोपे नाही. शिवाय, अशा घटनांनी पिडलेले डॉक्टर व पेशंटचं नातं कसं सावरावं, हा चिघळलेला प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
(लेखिका प्रसिद्ध भूलतज्ज्ञ आहेत.)
swats7767@gmail.com