महसूल, भूमी अभिलेखच्या 57 लाख दस्तऐवजांचे स्कॅनिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 11:35 PM2020-11-15T23:35:00+5:302020-11-15T23:35:07+5:30
ठाणे जिल्हा : दोन लाख मिळकतींचे ई-फेरफार लवकरच
सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महसूल, भूमी अभिलेखच्या ५७ लाख नऊ हजार ४७१ दस्तऐवजांच्या स्कॅनिंगचे काम पूर्ण झाले आहे. तर मालमत्ता, शेतीवाडीच्या एक लाख ८१ हजार ७४१ मिळकतींचे लवकरच ई-फेरफार आणि डिजिटलायझेशन शेतकऱ्यांसह विकासकांना उपलब्ध होणार आहे. यासाठी जिल्ह्यात संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागलेली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. या कामाचा आढावाही नुकताच घेतल्याचे त्याने निदर्शनात आणून दिले.
जिल्ह्यातील तालुक्यात उपअधीक्षक, भूमी अभिलेखचे सहा कार्यालये व नगर भूमापन अधिकाऱ्यांचे दोन आदी आठ कार्यालयांचे १२ लाख ८६ हजार ८९१ नकाशे, दस्तऐवज आहेत, तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल खात्याचे ४४ लाख २२ हजार ५८०, महसुली कागदपत्रांचे ५७ लाख नऊ हजार ४७१ महत्त्वाची कागदपत्रे, नकाशे आदी दस्तऐवज नुकताच स्कॅनिंग करण्यात आला आहे.
महसूल विभाग आणि भूमी अभिलेख खात्याचे अत्याधुनिकीकरणाच्या दृष्टीने या कागदपत्रांच्या स्कॅनिंगचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे.
राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाद्वारे या महत्त्वाच्या कागदपत्रांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. यासह ई-फेरफार तसेच शेती, बिनशेतीच्या नकाशांचे डिजिटलायझेशन करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. यानुसार, जिल्ह्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख व नगर भूमापन अधिकारी आदी आठ कार्यालयांत ‘ईपीसीआयएस’ संगणक प्रणालीमध्ये या एक लाख ८१ हजार ७४७ मिळकतपत्रिकांचे अद्ययावतीकरण केले आहे.
प्रिंटआउट तपासणी पूर्ण
मिळकतपत्रिकांंच्या डाटा एडिटिंगचे व प्रिंटआउट काढून तपासणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सध्या मिळकतपत्रिकेवर ऑनलाइन डिजिटल साइनचे काम पूर्ण झाले आहे. आता लवकरच ऑनलाइन फेरफार उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डिजिटलायझेशनसाठी तीन गावांची निवड
जिल्ह्यात फाळणी व इतर नकाशांवर बेसलाइन व ऑफसेट टाकून कच्चे टिपण तयार करून फाळणी नकाशे, पोटहिस्सा नकाशे, भूसंपादन नकाशे, ई-फेरफार आता उपलब्ध होणार आहेत. कोलाब्लॅड आज्ञावलीमध्ये डिजिटलायझेशनसाठी जिल्ह्यातील ठाणे परिसरातील मौजे नवघर, बेतवडे, डोमखार या गावांची निवड करण्यात आली आहे.