४० हजारांची लाच घेणाऱ्या सफाई कामगाराला रंगेहात पकडले
By अजित मांडके | Published: December 9, 2023 12:36 AM2023-12-09T00:36:54+5:302023-12-09T00:37:35+5:30
अँटी करप्शन ब्युरो, ठाणे यांनी ही कारवाई केली.
ठाणे : नळाचे थकित पाणी बीलाची रक्कम कमी करुन देण्याकरीता सुभाष गरूड (५४) याने स्वतःसाठी व त्यांच्या साहेबाकरीता ४८ हजारांची मागणी करून तडजोडीपोटी ४० हजारांची लाच घेणाऱ्या गरुड या ठाणे महापालिकेच्या सफाई कामगाराला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्याच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अँटी करप्शन ब्युरो, ठाणे यांनी ही कारवाई केली. ७१ वर्षीय यांनी याबाबत तक्रार केली होती. तक्रारदार यांचे हॉस्पिटल असून त्यांनी महापालिकेकडून नळाचे कनेक्शन घेतले आहे. या नळाचे थकित पाणी बीलाची रक्कम कमी करुन देण्याकरीता गरूड याने स्वतःसाठी व त्यांच्या साहेबाकरीता ४८ हजार रुपये लाचेच्या रक्कमेची मागणी तक्रारदार यांचेकडे केली होती.
तक्रारदार यांना त्यांना लाच दयावयाची इच्छा नसल्याने त्यांनी अँटी करप्शन ब्युरो, ठाणे यांच्या कडे तक्रार केली. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी तडजोडीअंती ४० हजार देण्याचे मान्य झाले. त्यानुसार शुक्रवार त्यानुसार सापळा लावण्यात आला आणि गरुड याला ४० हजारांची लाच घेतला रंगेहात पडकण्यात आले. गरुड हा सध्या घनकचरा विभागात कळवा प्रभाग समितीत कार्यरत होता.