डोंबिवलीतील चर्चमध्ये ग्लोबल वॉर्मिंगवर देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 12:14 AM2019-12-25T00:14:34+5:302019-12-25T00:15:07+5:30
नाताळच्या रोषणाईने उजळला परिसर : ‘शांतता नांदू दे’ची केली प्रार्थना; कॅरल सिंगिंग, देखावा स्पर्धा
डोंबिवली : शहरातील ख्रिस्ती बांधवांच्या घरी नाताळ सणाची लगबग सुरू आहे. घरोघरी रोषणाई, कंदिल लावण्यात आल्याने परिसर उजळून निघाला आहे. पश्चिमेतील गणेशनगर येथील रोमन कॅथलिक चर्चवरही रोषणाई करण्यात आली आहे. तेथे येशूच्या जन्माचा देखावा उभारण्यात आला असून त्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग या सध्याच्या ज्वलंत समस्येबाबत लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच त्याद्वारे समाजात क्रोध, द्वेष निर्माण करणाऱ्या घटना टाळून सर्वांना खूश ठेवण्याची आणि सर्वत्र शांतता नांदण्याची प्रार्थनाही करण्यात आली आहे.
ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला मंगळवारी सर्व ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जमले होते. सर्वांनी रात्री ८ वाजता एकत्र येऊन कॅ रल सिंगिंग सादर केले. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ आणि कोकणी अशी पाच भाषांतील देवाची गाणी सादर करण्यात आली. त्यानंतर मिसा करण्यात आला. त्यामध्ये छोट्या येशूचा जन्म दाखवला आहे. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला. त्यानंतर सर्व बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ज्या बांधवांनी पूर्वसंध्येला चर्चमध्ये येणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी ख्रिसमसच्या दिवशी सकाळी मिसा होणार आहे.
रोमन कॅथलिक चर्चमध्ये नाताळाचे औचित्य साधून कॅ रल सिगिंग साँग स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी डोंबिवलीत १४ झोन तयार करण्यात आले होते. एका झोनमध्ये १५ जणांनी सहभाग घेतला. या झोनमधून उत्कृष्ट गाणे गाणाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रभू येशूची महती सांगणारी गाणी स्पर्धकांनी क ॅरल सिंगिंगमध्ये सादर केली.
चर्चमध्ये येणाºया बांधवांसाठी स्टार बनवणे ही स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यानुसार अनेकांनी आपली कलात्मकता वापरून आकर्षक स्टार तयार केले आहेत. त्यांनी चर्चचा सर्व परिसर सजवण्यात आला आहे. उत्कृष्ट स्टारला पारितोषिकांना गौरवण्यात येणार आहे. नाताळच्या दिवशी उत्कृष्ट स्टार कोणाचा आहे ते समजणार आहे. क्रिब (घरकुल) स्पर्धाही घेण्यात येणार आहे.
या स्पर्धेअंतर्गत २७ डिसेंबरला परीक्षक घरोघरी जाऊन येशूच्या घरकुलाचा देखाव्यांची पाहणी करणार आहेत. त्यातून विजेता निवडण्यात येणार आहे.
शांततेचा संदेश देण्यासाठी सायकल रॅली
मंगळवारी सायंकाळी ५ वाजता ‘ह’ प्रभाग कार्यालयांच्या ठिकाणाहून दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीतून आनंदाचा आणि शांततेचा संदेश देण्यात येणार आहे. ही रॅली भोईरवाडी, उमेशनगर, रेतीबंदर रोड, आनंदनगर, दीनदयाल रोड, सम्राट चौक, गोपी टॉकीज आणि चर्चमध्ये समारोप होणार आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोलिसांना केकचे वाटप करण्यात येणार आहे.