ठाकुर्लीत घंटागाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 12:37 AM2021-01-04T00:37:19+5:302021-01-04T00:37:26+5:30

रहिवासी त्रस्त : कचरा संकलनाचे वाजले तीनतेरा

The schedule of bell trains in Thakurli collapsed | ठाकुर्लीत घंटागाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

ठाकुर्लीत घंटागाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
डाेंबिवली : एकीकडे शून्य कचरा मोहिमेंतर्गत केडीएमसीकडून ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाचे धडे नागरिकांना दिले जात असताना, या कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या घंटागाड्या वाहनांचे वेळापत्रक कोलमडल्याने, गेल्या तीन ते चार दिवसांपासून कचरा संकलनाचे तीनतेरा वाजल्याचे चित्र ठाकुर्ली परिसरात पाहायला मिळत आहे. कचरा नेण्यासाठी नियमित गाडी येत नाही. त्यात ओला आणि सुका कचऱ्याचे ढिगारे गृहसंकुलाबाहेर जमा होत असल्याने दुर्गंधीचा त्रासही सहन करावा लागत आहे.


केडीएमसीने गृहनिर्माण संकुलांपाठोपाठ आता हॉटेल, मॉल, मार्केट आणि लग्नाचे हॉल यांनाही त्यांच्या कचऱ्यावर प्रकिया करणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन राबविण्यासाठी नागरिकांना ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण करून देणे बंधनकारक केले आहे. महापालिकेच्या आवाहनानंतर, तसेच दंडात्मक कारवाईच्या इशाऱ्यानंतर का होईना, नागरिकांकडून ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. 


ठाकुर्ली परिसरातील कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता, तसेच ९० फिट रोडवरील गृहसंकुलात राहणाऱ्या रहिवाशांकडूनही कचरा वर्गीकरणाचे नियम काटेकोर पाळले जात आहेत, परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून कचरा नेण्यासाठी येणारी वाहने फिरकलीच नाहीत. 
त्यामुळे ओला कचरा घरातच जैसे थे पडून आहे. त्याचबरोबर, सुक्या कचऱ्याच्या संकलनाचेही तीनतेरा वाजले आहेत. कचऱ्याची वाहतूक करणारी वाहने केव्हा येतील, या प्रतीक्षेत काही गृहसंकुलांच्या बाहेर डब्यांमध्ये साचलेला हा कचरा गेले चार दिवस तसाच पडून आहे. यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शनिवारी गाडी आली होती, परंतु रविवारी आली नाही. 


परिणामी, ओल्या कचऱ्यासह सुका कचराही जैसे थे पडून असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, या संदर्भात केडीएमसी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता, तो होऊ शकला 
नाही.

आयुक्तांनी लक्ष घालावे
एकीकडे कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक केले असताना, त्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे, परंतु कचरा वाहून नेणारी वाहनेच दोन ते तीन दिवस येत नाहीत, हे चुकीचे असून, तातडीने महापालिका आयुक्तांनी यात लक्ष घातले पाहिजे.
    - लक्ष्मण इंगळे, 
    सचिव, सर्वाेदय लीला संकुल

Web Title: The schedule of bell trains in Thakurli collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.