शाळेच्या इमारतीची झाली दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:47+5:302021-06-17T04:27:47+5:30
शहापूर : नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील डोळखांबजवळ सलेल्या साकडबाव या दुर्गम आदिवासी भागातील स्वातंत्र्यवीर राजगुरू शाळेचे मोठ्या ...
शहापूर : नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील डोळखांबजवळ सलेल्या साकडबाव या दुर्गम आदिवासी भागातील स्वातंत्र्यवीर राजगुरू शाळेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाने शाळेच्या इमारतीचे छप्पर उडाले आहे. ही शाळा उंचावर आहे. नवे छप्पर टाकण्यासाठी चार लाख खर्च अपेक्षित आहे. तहसील कार्यालयाकडे नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आलेला आहे.
शाळेला २० टक्के सरकारी अनुदान आहे. सरकारी मदतीबाबत विचारले असता ही शाळा नवनिर्माण ट्रस्टची असल्याने अशी मदत मिळणे अजून तरी शक्य नाही, असे मुख्याध्यापक प्रकाश कोर यांनी सांगितले. असाच प्रकार काही वर्षांपूर्वी घडला होता. तेव्हाही लोकवर्गणीतून शाळेच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. एकूण दीडशे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. शाळा दुर्गम भागात असल्याने गोरगरीब आदिवासी शेतमजुरांची ही मुले आहेत.
शिक्षक हे अतिशय जिद्दी व मेहनती आहे. गेले अनेक वर्ष त्यांनी आपल्या पोटाला चिमटा घेऊन या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले आहे. आता दोन वर्षांपासून केवळ २० टक्के अनुदान आहे. शहापूरवासीयांकडून शक्य होईल तेवढी मदतीची अपेक्षा आहे, असे कोर म्हणाले.