Video: अंबरनाथमध्ये स्कूल बस पलटली; विद्यार्थी थोडक्यात बचावले
By पंकज पाटील | Published: September 26, 2022 11:52 AM2022-09-26T11:52:09+5:302022-09-26T12:17:13+5:30
अंबरनाथच्या ग्रीन सिटी परिसरात नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत सोडण्यासाठी स्कूल बस निघाली होती. मिनी बस मध्ये एकूण 17 विद्यार्थी बसले होते
अंबरनाथ: सोमवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान अंबरनाथ पूर्व येथील ग्रीन सिटी सोसायटीच्या आवारात एक स्कूल बस उलटली आहे. या स्कूलबस मध्ये 17 विद्यार्थी होते. सुदैवाने या विद्यार्थ्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
अंबरनाथच्या ग्रीन सिटी परिसरात नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत सोडण्यासाठी स्कूल बस निघाली होती. मिनी बस मध्ये एकूण 17 विद्यार्थी बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन ही बस अंबरनाथच्या इनरव्हील स्कूलमध्ये निघणार होती. यावेळी ही बस ग्रीन सिटी संकुलात एका चढणीवर उभी असताना अचानक चालकाचा ताबा गाडीवरून सुटल्याने ही बस थेट रिव्हर्समध्ये खाली उतरली आणि एका डिव्हायडरला आदळून ती बस उलटली. हा सर्व प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये देखील कैद झाला आहे. ही बस उलटल्यानंतर लागलीच परिसरात इतर शाळेचेजे विद्यार्थी उभे होते ते देखील अपघातग्रस्त बस मधील विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावले तसेच सोसायटीतील इतर नागरिकांनी या सर्व विद्यार्थ्यांना बसमधून सुखरूप बाहेर काढले.
अंबरनाथमध्ये शाळेची स्कूल बस उलटली;विद्यार्थी थोडक्यात बचावले pic.twitter.com/Ht4Ke77iuy
— Lokmat (@lokmat) September 26, 2022
या अपघातात सर्व 17 विद्यार्थी सुखरूप असून एका विद्यार्थिनीला केवळ किरकोळ दुखावत झाले आहे. नेमका हा अपघात कसा घडला हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.