आहारात बदल करण्याची शाळा-कॉलेजना तंबी, एफडीएचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:51 AM2019-06-12T00:51:57+5:302019-06-12T00:52:02+5:30
एफडीएचे पत्र : पाच टप्प्यात कार्यक्रम
ठाणे : शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना सकस आणि पोषक आहार मिळावा यावर भर देऊन, तसेच तेथील उपाहारगृहात मिळणारे जंक फूड कमी करण्याबाबत राज्य शासनाच्या आदेशानंतर कोकण विभागातील ९७१ शाळा-कॉलेजच्या व्यवस्थापनाला अन्न व औषध प्रशासन (कोकण) विभागाने (एफडीए) पत्र धाडले आहे. येत्या काही दिवसांत शाळा आणि कॉलेजची संख्या वाढण्याची शक्यता असून हे पत्र देण्याची अंमलबजावणी मे अखेरपासून सुरू झाल्याची माहिती ठाणे एफडीए सूत्रांनी दिली.
जंक फूडच्या दिवसेंदिवस वाढत्या मागणीमुळे त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यातूनच मे महिन्यात शासनाने शाळा आणि कॉलेजमधील उपाहारगृहात विद्यार्थ्यांना सकस आणि पोषक आहार मिळावे यावर भर देऊन जंक फूडचे वापर कमी करणारा अध्यादेश काढला. त्यानुसार, ठाणे एफडीएने त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. त्यासाठी कोकण विभागातील सह-आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील शाळा आणि कॉलेजच्या व्यवस्थापनाला पत्र धाडण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ९७१ शाळा-कॉलेज व्यवस्थापनाला पत्र दिल्याची माहिती एफडीएने दिली. शाळा-कॉलेज सुरू झाल्यावर हेल्थ टीम तयार करून उपाहारगृहातील मेनू बदलाबाबत सूचना करण्यात येणार आहेत. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मेनूचा आढावा घेतला जाणार असून, आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात शिबीर घेण्यात येणार आहे. त्यानंतर १९ नोव्हेंबरपासून सुचवलेल्या सूचना कार्यान्वित क रण्यात येणार आहेत.
ठाण्यातील ७०० शाळा-कॉलेजला सूचना
ठाणे एफडीएअंतर्गत ठाणे, रायगड,रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि पालघर हे पाच जिल्हे येत असून त्यामध्ये ठाणे ६९९ शाळा-कॉलेजला पत्र दिले आहे. त्यापाठोपाठ रत्नागिरी १६५,पालघर ६६,रायगड-३५ आणि सिंधुदूर्ग ६ अशा कोकणातील ९७१ शाळा-कॉलेजला पत्र दिले आहे.
पाच कुलगुरूंकडून मागवली कॉलेजची यादी
कोकण विभागातील मुंबई विद्यापीठ,एसएनडीटी,दापोली कोकण कृषी विद्यापीठ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ या पाच विद्यापीठांच्या कुलगुरूंकडून कॉलेजची यादी मागवली आहे.
बर्गर कधीतरी मिळणार
शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पोषक आहार म्हणजे फळे आणि भाज्यांचे पदार्थ मिळावे,त्याबाबत शासनाने एक त्रिकोण तयार केला आहे.हत्यामध्ये बर्गर कधीतरीच मिळावा, त्यापाठोपाठ आईस्क्रिम,तेलकट पदार्थ आदी देण्यात यावे, असे म्हटले आहे.
आतापर्यंत कोकणातील ९७१ शाळा आणि कॉलेज व्यवस्थापनाला आहारातील बदलाबाबत पत्र धाडले आहे. शाळा, कॉलेजची यादी संबंधितांकडून मागवली आहे. त्यामुळे त्यांची संख्या वाढू शकते.
- शिवाजी देसाई, सहआयुक्त, ठाणे एफडीए, कोकण विभाग