जल दिन अध्यादेशाबाबत शाळा अनभिज्ञ
By admin | Published: March 15, 2016 01:13 AM2016-03-15T01:13:00+5:302016-03-15T01:13:00+5:30
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीबचतीचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी सरकारने राज्यभरातील शाळांमध्ये २२ मार्चला जलदिन साजरा करण्याचे
- जान्हवी मोर्ये, डोंबिवली
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीबचतीचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी सरकारने राज्यभरातील शाळांमध्ये २२ मार्चला जलदिन साजरा करण्याचे ठरवले आहे. या दिनानिमित्त १६ ते २२ मार्च हा जल जनजागृती सप्ताह साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाचा अध्यादेश सरकारने ९ मार्चला काढला आहे. मात्र, तो अनेक शाळांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे हा दिन साजरा होण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
डोंबिवलीतील स.वा. जोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक अण्णासाहेब डावणे यांनी सांगितले की, पाणी वाचवाचे धडे आम्ही विद्यार्थ्यांना कार्यानुभव विषयाद्वारे देतो. सरकारने जल दिन साजरा करण्याबाबत काढलेला अध्यादेश आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये पाणीवापराविषयी जागृती हा महत्त्वाचा विषय आहे. पाणीकपातीचा फटका आमच्या शाळेला बसत आहे. नुकतेच आठ दिवस शाळेत पाणी आले नव्हते, असे ते म्हणाले.
कल्याणमधील द्वारका विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मीरा दळवी म्हणाल्या की, जलदिनाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची काहीच माहीत नाही.
आंबिवलीतील पाटील बाल विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका मीना राणे यांनीही शासनाचा जीआर आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. सरकारी अध्यादेशापूर्वीच आमच्या शाळेने १ जानेवारीला जलजागृतीचा प्रयत्न केला.
केवळ कागदी घोडे
१६ मार्चपासून जल दिन साजरा करायचा आहे. त्यासाठी १६ ते २२ मार्चदरम्यान जलजागृती सप्ताह साजरा करण्याचा सरकारचा अध्यादेश आहे.
तो किमान १० दिवसअगोदर शाळांना मिळणे आवश्यक होते. शिक्षण विभागाची जलदिनाची जागृती ही अध्यादेश काढून केवळ कागदी घोडे नाचवण्यापुरतीच होती, अशी टीका जाणकारांकडून होत आहे.
तसेच परीक्षांच्या काळात हा दिवस कसा साजरा करणार, असा सवालही त्यांच्याकडून विचारला जात आहे.
चित्रकला, निबंध स्पर्धा, व्याख्याने घेण्याचे आदेश
जलजागृती सप्ताहात विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषण, पाण्याची गुणवत्ता व जलसाक्षरता याबाबत जागृती करण्यासाठी शालेयस्तरावर चित्रकला, निबंध स्पर्धा, व्याख्यान, वक्तृत्व, शालेय सहली, प्रदर्शन आदी उपक्रम राबवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागातर्फे दिले आहेत.
अधिकृत माहिती नाही
सम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले की, सरकारी अध्यादेश व्हॉट्सअॅपद्वारे मला मिळाला आहे.
परंतु, अधिकृत माहिती शिक्षण विभागाकडून शाळेपर्यंत पोहोचलेली नाही. सरकारचा उद्देश खूप चांगला आहे. ९ मार्चला काढलेला जीआर आमच्यापर्यंत पोहोचणे अपेक्षित होते.
तो का पोहोचला नाही, याविषयी काहीच सांगता येणार नाही. आमच्या शाळेने पाणी वाचवाचा संदेश देण्यासाठी काही दिवसांपूर्वी पथनाट्य सादर केले होते.