दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणारी शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:47 PM2020-02-23T23:47:17+5:302020-02-23T23:47:22+5:30
योग प्रात्यक्षिके, दहीहंडीचे थर रचण्यात दिव्यांग विद्यार्थी अव्वल
- अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी : पद्मश्री अनुताई वाघ यांचे बालशिक्षणाचे कार्य सर्वश्रुत आहे. मात्र कोसबाड या त्यांच्या कर्मभूमीत आदिवासी मुक - बधीर बालकांच्या संपर्कात आल्यावर त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी २३ जून १९८० मध्ये त्यांनी ‘मुक बधीर बाल विकास केंद्रा’ची स्थापना केली. चाळीस वर्षांचा मागोवा घेता, या शाळेने यशस्वी घोडदौड केली असून आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य सक्षमपणे सुरू आहे.
येथे पहिली ते सहावीपर्यंतचे वर्ग असून दहावी पर्यंतच्या शिक्षणासाठी त्यांना मार्गदर्शन केल्याने विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त वर्गाबाहेरील स्पर्धात्मक युगाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना चित्रकला, हस्तकला, शिवणकाम, नृत्य, नाट्य आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाते. अध्ययन - अध्यापनातील सुसंवाद साधण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र आणि ग्रुप हीअरिंग एड यंत्र उपलब्ध आहे. त्यांची वाचा, उच्चार शुद्ध असावेत म्हणून स्पीच रूम उपलब्ध असून त्यांना वाचा उपचारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाते. कानांची तपासणी आणि श्रवणालेख काढण्याकरिता आॅडीओमेटरी रूम आहे. त्यासह ई-लर्निग, प्ले रूम, प्रोजेक्टर अशा अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते.
शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी प्रशिक्षित असून विविध शहरात होणाऱ्या सेमिनारच्या माध्यमातून ते स्वत:ला अद्ययावत ठेवतात. केवळ नोकरी नव्हे तर दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हा धर्म अशी त्यांची भावना आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना पैलू पडण्यात त्यांना यश येते. दिव्यांगांच्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत ‘गंगेची माया’ या शाळेने सादर केलेल्या बालनाट्याला प्रथम परितोषिक मिळाले होते. तालुक्यातील शासकीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमानिमित्ताने आयोजित सांस्कृतिक स्पर्धेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत उतरून हे विद्यार्थी अव्वल येतात. तर जिल्हास्तरीय दिव्यांग स्पर्धेत अनेक क्रीडा प्रकारातही यशस्वी होतात. त्याची प्रचिती राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही दिसत असून आठ विद्यार्थ्यांची क्रीडास्पर्धेसाठी निवड झाली आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यात मोलाचा वाटा असणाºया शिक्षकांना संस्थेकडूनही प्रोत्साहन मिळते.
उपयुक्त उपक्रम: १९७५ या आंतरराष्ट्रीय महिला वर्षनिमित्त ठाणे जिल्हा स्त्री शक्ती जागृती समितीची निर्मिती करून या शाळेची स्थापना झाली. ७० विद्यार्थी संख्या असलेल्या या निवासी शाळेत अन्य विद्यार्थ्यांचा खर्च संस्था करते. वयाच्या तिसºया वर्षापासून शाळेत आणि पाच वर्षांनंतर वसतीगृहात प्रवेश दिला जातो. संस्थाचालक मालती चुरी, सचिव मधुमती राऊत आणि पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाकरिता नवोपक्रम राबविण्यास तत्पर असतात.
सहशालेय उपक्रम: अपंग व कर्णबधिर दिन आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दिन साजरे, थोर नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथी, विविध सण, शैक्षणिक सहल तसेच क्षेत्र भेट.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळेत शिक्षण घेणे त्यांच्या उज्ज्वल भवितव्याकरिता अत्यावश्यक आहे. मात्र समाजात त्याबद्दल उदासीनता आहे. उन्हाळी सुट्टीत परिसरातील गावांमध्ये फिरून शिक्षक अशा विद्यार्थ्यांचा शोध घेतात. जि. परिषद शाळेत असे विद्यार्थी असल्यास या शाळेशी संपर्क साधावा. - शोभा चव्हाण, (मुख्याध्यापक, मुक बधीर बाल विकास केंद्र)