अमेरिकेला जाण्यासाठी शालेय मुलीने सोडले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:48 AM2020-02-15T00:48:24+5:302020-02-15T00:48:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : आईवडील सुखी व्हावेत, यासाठी अमेरिकेत जाऊन काम करण्याचा निश्चय मध्य प्रदेशातील झोरा गावातील इयत्ता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : आईवडील सुखी व्हावेत, यासाठी अमेरिकेत जाऊन काम करण्याचा निश्चय मध्य प्रदेशातील झोरा गावातील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीने केला होता. परंतु, व्हिसासाठी आवश्यक असलेले ६० हजार रुपये नसल्याने तिने मुंबई गाठून उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतला. या प्रयत्नात ती कल्याणपर्यंत आली. पुढे मुंबईला जायचे कसे, या विवंचनेत ती कल्याण रेल्वेस्थानकात भटकत असताना एका महिला पोलिसाच्या निदर्शनास पडली. तिच्या घराचा थांगपत्ता लावत तिला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.
वाहतूक अधिकारी सुनीता राजपूत यांना दोन दिवसांपूर्वी एक मुलगी बेवारस स्थितीत कल्याण स्थानकाबाहेर आढळली. त्यांनी या मुलीला महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चौकशी करताना तिच्या दप्तराची तपासणी केली. त्यात ती मध्य प्रदेशातील झोरा गावातील असल्याचे उघड झाले. सातवीत शिकणारी आणि मजूर कुटुंबातील ही मुलगी गाव सोडून का आली, याची विचारपूस केली गेली. तिच्याकडे दप्तर असल्याने महात्मा फुले चौक पोलिसांनी तिच्या शाळेशी आणि स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला.
यावेळी तेथे ही मुलगी हरवल्याची तक्रार तिच्या पालकांनी दाखल केल्याचे समजले. त्यानंतर मध्य प्रदेश पोलीस शुक्रवारी तिच्या आईसह कल्याणला दाखल झाले. त्या मुलीला त्यांच्या ताब्यात दिले असून, ते सर्वजण मध्य प्रदेशला मार्गस्थ झाल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांनी दिली. सुदैवाने ही मुलगी पोलिसांच्या निदर्शनास पडल्याने तिला पालकांकडे स्वाधीन करणे शक्य झाले, असे सूत्रांनी सांगितले.