शालेय वाटदेखील बिकटच!

By admin | Published: July 23, 2015 03:53 AM2015-07-23T03:53:37+5:302015-07-23T03:53:37+5:30

शैक्षणिक साहित्याविना कल्याण-डोंबिवली महापालिका शाळांमध्ये शिक्षणाचा बोजवारा उडाला असताना काही शाळांभोवतीचा परिसरदेखील फारसा

School lodging too good! | शालेय वाटदेखील बिकटच!

शालेय वाटदेखील बिकटच!

Next

प्रशांत माने , कल्याण
शैक्षणिक साहित्याविना कल्याण-डोंबिवली महापालिका शाळांमध्ये शिक्षणाचा बोजवारा उडाला असताना काही शाळांभोवतीचा परिसरदेखील फारसा आलबेल नाही, याची प्रचिती पश्चिमेकडील आधारवाडी परिसरातील साने गुरुजी प्राथमिक शाळा पाहतांना येते. शाळेत जाण्याची वाट अरुंद आणि त्यातच चिखल, घाण अशा दलदलीतूनच विद्यार्थी आणि शिक्षकांना ये-जा करावी लागत आहे.
येथील विद्यार्थी पटसंख्या ८८ असून बालवाडीत १२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. १९४९ पासून अस्तित्वात असलेल्या या शाळेच्या वास्तूची अवस्था सद्य:स्थितीला धोकादायक अशीच आहे. बाजूलाच शाळेच्या नव्या वास्तूचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. परंतु, दोन महिन्यांपासून हे काम बंद पडलेले आहे. त्यामुळे सध्या जुन्या वास्तूत अस्तित्वात असलेल्या एका खोलीतच वर्ग भरविले जात आहेत. सकाळी पाचवी ते सातवी तर दुपारी पहिली ते चौथी असे वर्ग आलटूनपालटून भरतात. या ठिकाणी ३ संगणक दिले आहेत. परंतु, ते बंद असल्याने विद्यार्थी संगणकीय ज्ञानापासून वंचित आहेत. शाळेला ५ शिक्षक असले तरी निवडणुकीच्या मतदार याद्या बनविणे, हगणदारीमुक्त गाव या योजनेंतर्गत शौचालयांचा सर्व्हे करणे अशा कामांची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ दिला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
शाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अन्य कोणतेही शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. दोन दिवसांपासून चिककी देण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे शिक्षण मंडळाच्या होत असलेल्या दुर्लक्षा प्रकरणी सोमवारच्या केडीएमसीच्या महासभेत सदस्यांकडून अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेण्यात आले होते. यावर
तत्काळ समस्यांचे निवारण करण्याची आणि सुविधा पुरविण्याची ग्वाही प्रशासनाने दिली आहे. एकंदरीतच परिस्थिती पाहता शिक्षण मंडळ यातून काही बोध घेईल, याबाबत मात्र साशंकता आहे.

Web Title: School lodging too good!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.