उथळसर येथील शाळेचा भूखंड ठामपाच्या हातून निसटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:47 AM2021-08-20T04:47:05+5:302021-08-20T04:47:05+5:30
ठाणे : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उथळसर येथील शाळेचा भूखंड ठामपाच्या हातून निसटला असल्याची गंभीर बाब बुधवारी झालेल्या महासभेत उघड ...
ठाणे : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उथळसर येथील शाळेचा भूखंड ठामपाच्या हातून निसटला असल्याची गंभीर बाब बुधवारी झालेल्या महासभेत उघड झाली. ४२ वर्षांनंतरही या भूखंडाचा सात-बारा महापालिकेला आपल्या नावावर करता आलेला नसताना जितो या संस्थेबरोबर करार करून त्यांना ही जागा शैक्षणिक उपक्रमासाठी देऊ केली आहे. परंतु, आता ही जागाच महापालिकेच्या ताब्यात नसल्याचे उघड झाले. या जागेबाबत केलेल्या ॲग्रिमेंटची प्रतही गहाळ झाली आहे. आता हा भूखंड परत मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी महासभेत दिली.
उथळसर येथे सात नंबरची शाळा होती. तिची इमारत धोकादायक झाल्याने ती पाडून त्यानंतर जितो या संस्थेबरोबर करार करून ही जागा शैक्षणिक उपक्रमासाठी देऊ केली. परंतु, आता यापूर्वी ज्या संस्थेची ही जागा होती, तिने पुन्हा जागेवर दावा करून ती जागा विकासकाला विकून टाकली. विशेष म्हणजे या संस्थेकडे सात-बारा आणि प्रॉपट्री कार्ड असल्याचा मुद्दा बुधवारच्या महासभेत नगरसेवकांनी उघड केला. त्यामुळे जागा ताब्यात नसतानाही इतर संस्थेशी करार कशाला केला, असा सवाल भाजपच्या नगरसेवकांनी केला. ४२ वर्षांनंतरही पालिकेला ही जागा आपल्या नावावर करता आलेली नाही. केवळ नगरपरिषद असताना हब्बीबुला ट्रस्टबरोबर करारनामा करून ती घेतली होती. त्यासंदर्भातील एक ॲग्रिमेंटही करून ९० टक्के रक्कमही अदा केली होती, अशी माहिती आयुक्तांनी दिली.